मॉस्को,
russia election results 2026युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियात झालेल्या संसदीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सत्ताधारी ‘युनायटेड रशिया’ पक्षाने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत पक्षाला ५७ टक्के मते मिळाली असून ४५० सदस्यांच्या स्टेट ड्युमामध्ये स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर रशियात झालेली ही पहिली संसदीय निवडणूक आहे.
पुतिन यांनी या निवडणुकीचा संबंध राष्ट्रीय एकता आणि रशियन सैनिकांच्या समर्थनाशी जोडला आहे. युद्धाला उघडपणे विरोध करणाऱ्या ‘याब्लोको’सह काही विरोधी पक्ष आणि युद्धविरोधी उमेदवारांना राष्ट्रीय निवडणूक यादीतून बाहेर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात सरकारच्या धोरणांना समर्थन देणारे पक्षच प्रामुख्याने राहिले. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत सुमारे ५७ टक्के मतदान झाले असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अंतिम निकाल २५ सप्टेंबरच्या आसपास जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यात ‘युनायटेड रशिया’ला दोन तृतीयांश जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी युक्रेनने मॉस्को आणि आसपासच्या भागांवर १,६०० हून अधिक ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा दावा रशियन अधिकाऱ्यांनी केला आहे. यातील सुमारे ४५० ड्रोन मॉस्कोच्या दिशेने येत होते. या हल्ल्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून, त्यात ४४ वर्षीय महिला आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. मॉस्कोच्या महापौरांनी राजधानीतील एका मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचेही नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. या प्रकल्पातील हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या हल्ल्यानंतर रशिया युक्रेनविरोधात प्रत्युत्तरात्मक कारवाई करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रशियाकडून तेल खरेदीवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यासाठी ट्रम्प यांचे आभार मानल्याचे झेलेंस्की यांनी सांगितले.