साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणावर आयआयटी मुंबईची माफी

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाची भूमिका स्पष्ट

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
मुंबई
sahil wakode death case आयआयटी मुंबईतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. या घटनेनंतर विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, साहिलची ‘संस्थात्मक हत्या’ झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, विविध संघटनांकडूनही संस्थेच्या प्रशासनाविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी डीन प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना तातडीने पदावरून निलंबित केले आहे
 

sahil-wakode-death-case-iit-bombay-apology-professor-action 
या वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबई प्रशासनाची या प्रकरणातील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. साहिल वाकोडे यांच्या मृत्यूबाबत यापूर्वी करण्यात आलेल्या वक्तव्यावरून संस्थेने माफी मागितली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरू असताना त्याच्या निष्कर्षांपूर्वी कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थेने घेतली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध मागण्यांपैकी अनेक मागण्या मान्य करण्यात आल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
 
या प्रकरणाशी संबंधित प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे साहिलच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर संस्थेने काही पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
प्रशासनाकडून दिलगिरी आणि जुन्या निवेदनावरून माघार
 
 
साहिलच्या निधनानंतर आयआयटी प्रशासनाने घाईघाईत केलेल्या वक्तव्यांवरून तीव्र खेद व्यक्त केला आहे. कोणतीही अधिकृत चौकशी पूर्ण होण्याआधीच घटनेबाबत निष्कर्ष काढणे आणि चुकीची माहिती देणे अयोग्य होते, असे संस्थेने मान्य केले. ‘साहिलच्या आत्महत्येप्रकरणी आधी काढलेल्या पत्रकातील माहितीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच घटनेची कारणे मांडणे अनुचित होते,‘ असे स्पष्टीकरण आयआयटीने दिले आहे.
काय होता आधीचा दावा आणि वाद ?
 
 
18 सप्टेंबर रोजी मध्य-सत्र परीक्षेदरम्यान साहिलने टोकाचे पाऊल उचलले होते. या घटनेनंतर 19 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या सुरुवातीच्या निवेदनात आयआयटीने असा दावा केला होता की, साहिल परीक्षेदरम्यान मोबाईलवर ’चॅटजीपीटी’चा वापर करताना पकडला गेला होता. त्याला केवळ समुपदेशन करून कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन देण्यात आले होते, असे प्रशासनाने म्हटले होते. मात्र, पोलीस तपास सुरू असतानाच विद्यार्थ्यावर आरोप केल्यामुळे आयआयटी प्रशासनावर चौफेर टीका झाली होती.
 
 
 
नेमके प्रकरण काय?
 
 
आयआयटी मुंबईमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा साहिल रवींद्र वाकोडे याचा मृतदेह वसतिगृहात आढळून आला. साहिल हा मूळचा यवतमाळचा रहिवासी होता. त्याने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी संस्थेकडून त्याचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. तसेच साहिलला जातीय भेदभावालाही सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.साहिलच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पवई पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, मृत्यूमागील नेमकी कारणे तपासातून स्पष्ट होणार आहेत.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आयआयटी मुंबईसारख्या देशातील अग्रगण्य संस्थेत दलित-बहुजन विद्यार्थ्यांशी संबंधित जातीय अत्याचाराच्या घटना यापूर्वीही घडल्याचा दावा त्यांनी केला. अनिकेत अंभोरे, दर्शन सोलंकी आणि आता साहिल वाकोडे यांच्या प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी या घटनांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.संस्थेतील जातीय भेदभावाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पातोडे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संस्थेचे डीन आणि संचालक यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
 
 
 
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूमुळे आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे संस्थेने यापूर्वीच्या वक्तव्याबद्दल माफी मागत पोलिसांच्या तपासाचा निष्कर्ष येईपर्यंत प्रकरणावर भाष्य करणे टाळण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.