मुंबई
saurav gurjar ‘महाभारत’ मालिकेत भीमची भूमिका साकारणारा आणि रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ या चित्रपटात झळकलेला अभिनेता सौरव गुर्जर सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. एका 29 वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप सौरववर केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आल्यानंतर सौरवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, संबंधित महिलेने सौरव गुर्जरविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे गचीबोवली पोलिसांनी मुंबई विमानतळावरून सौरवला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपांबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, 2021 मध्ये संबंधित महिलेची आणि सौरवची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत मोबाइल क्रमांक शेअर केले आणि व्हॉट्सअॅपवरून संवाद सुरू झाला. कालांतराने या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात झाल्याचा महिलेचा दावा आहे.
महिलेच्या आरोपानुसार, 25 डिसेंबर 2021 रोजी तिची सौरवसोबत प्रत्यक्ष भेट झाली. पहिल्याच भेटीत सौरवने तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे. याच आश्वासनाच्या आधारे सौरवने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत असून, सौरव गुर्जर याच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.
दरम्यान, सौरव गुर्जरने अभिनयासोबतच कुस्तीच्या क्षेत्रातही काम केले आहे. माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू म्हणूनही त्याची ओळख आहे. अभिनयाच्या क्षेत्रात त्याने अनेक पौराणिक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘महाभारत’मधील भीमच्या भूमिकेमुळे त्याला विशेष ओळख मिळाली. याशिवाय ‘शिव शक्ती- त्याग तांडव’, ‘वीर आंजनेय’ आणि ‘संकटमोचन महाबली हनुमान’ यांसारख्या मालिकांमध्येही तो दिसला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ या चित्रपटाचाही तो भाग होता. मात्र, आता लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे त्याचे नाव एका कायदेशीर प्रकरणात आले आहे.