फ्री फायर’ गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

उत्तर प्रदेशातील तरुणाने ओढले प्रेमाच्या जाळ्यात

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
free fire game ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार शहरात पुन्हा वाढीस लागले आहेत. ‘फ्री फायर’ हा गेम खेळताना उत्तर प्रदेशातील तरुणाशी सूत जुळलेल्या बेलतरोडी परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. बेलतरोडी पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून मुलीची सुटका केली. आरोपीला ताब्यात घेतले आहे.
 

free fire 
 
 
बेलतरोडी ठाण्याच्या हद्दीत राहणारी मुलगी मोबाईलवर ‘फ्री फायर’ गेम खेळत असताना तिची ओळख सीतापूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी सूरज कुमार राजपूत याच्याशी झाली. गेमच्या माध्यमातून सुरू झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमाच्या जाळ्यात झाले आणि आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी ही मुलगी अचानक घरातून निघून गेल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. अखेर पालकांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक घटकांच्या आधारे मुलगी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे असल्याचे निष्पन्न झाले.free fire game माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचे एक पथक तातडीने सीतापूरकडे रवाना झाले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवून पोलिसांनी मुलीचा ठावठिकाणा शोधून तिची सुखरूप सुटका केली. नागपुरात आणून तिची विचारपूस केली असता, आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बाब पुढे आली. पोलिसांनी आरोपी सूरज कुमार राजपूत ताब्यात घेत नागपुरात आणले आहे.