मुंबई
shruti haasan अभिनेत्री श्रुती हसन तिच्या स्पष्टवक्त्या आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली श्रुती अनेकदा वैयक्तिक अनुभव आणि विविध सामाजिक विषयांवर मोकळेपणाने व्यक्त होताना दिसते. नुकतीच तिने अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला. या संवादादरम्यान श्रुतीने हार्मोन्स, मासिक पाळी आणि त्यासंदर्भातील गैरसमज यांसह चित्रपटाच्या सेटवरील आपल्या अनुभवांबाबतही महत्त्वपूर्ण भाष्य केले.
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना आणि त्याचा कामावर होणारा परिणाम याबाबत श्रुतीने आपला अनुभव सांगितला. विशेषतः चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महिलांना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा तिने उपस्थित केला. एका को-स्टारने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिल्यानंतर चित्रीकरणाच्या वेळापत्रकात त्याच्या परिस्थितीनुसार बदल करण्यात आल्याचा अनुभव तिने सांगितला. मात्र, महिलांच्या मासिक पाळीच्या वेदनांकडे त्याच प्रकारे पाहिले जात नसल्याची खंतही तिने व्यक्त केली.
याच संदर्भात बोलताना श्रुतीने मिश्कील, पण गंभीर मुद्दा मांडला. पुरुषांनाही मासिक पाळी यावी, अशी आपण हजारो वेळा प्रार्थना केल्याचे तिने सांगितले. पुरुषांनाही पिरियड्सचा अनुभव आला, तर महिलांना ‘पिरियड हॉलिडे’ मिळण्यासाठी तो मुद्दा थेट करारात समाविष्ट करता आला असता, असे श्रुतीने म्हटले.
पॉडकास्टमध्ये श्रुतीने स्वतःच्या आरोग्याशी संबंधित अनुभवही शेअर केला. PCOS मुळे मासिक पाळीदरम्यान तिला मोठ्या प्रमाणात वेदना सहन कराव्या लागतात, असा खुलासा तिने केला. मात्र, करिअरच्या सुरुवातीच्या काळात चित्रीकरणाच्या सेटवर या त्रासाबद्दल कुणाशीही मोकळेपणाने बोलणे तिला शक्य होत नव्हते, असे तिने सांगितले.
मासिक पाळीबाबत अनेक जण उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करतात, याकडेही श्रुतीने लक्ष वेधले. सेटवर एखाद्या अभिनेत्रीची ऊर्जा कमी जाणवत असेल, तर त्यामागे मासिक पाळी किंवा हार्मोनल कारणे असू शकतात, याचा विचार न करता काही दिग्दर्शक तिची एनर्जी लेव्हलच कमी असल्याचे गृहीत धरत असत, असा अनुभव तिने व्यक्त केला.
श्रुती आणि सोहा अली खान यांच्या चर्चेत महिलांच्या शरीरातील हार्मोन्स आणि मासिक पाळीशी संबंधित गैरसमजांवरही सविस्तर चर्चा झाली. मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याचा नैसर्गिक भाग असूनही त्याबाबत कामाच्या ठिकाणी आणि विशेषतः मनोरंजन क्षेत्रात पुरेशी संवेदनशीलता नसल्याचा मुद्दा श्रुतीच्या अनुभवातून पुढे आला.
दरम्यान, श्रुती हसन अखेर 2025 मध्ये लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटात अन्य कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून, अभिनेता आमिर खाननेही यात विशेष छोटी भूमिका साकारली होती.
मासिक पाळीच्या वेदना, त्याचा कामावर होणारा परिणाम आणि महिलांनी या विषयावर मोकळेपणाने बोलण्याची गरज याबाबत श्रुतीने केलेल्या स्पष्ट वक्तव्यामुळे तिच्या या पॉडकास्टमधील संवादाची सध्या चर्चा होत आहे.