mamta trinamool तृणमूल काँग्रेसचे नाव आणि निवडणूक चिन्ह गाेठवण्याच्या निर्णयाला आव्हान देत माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करत तातडीची सुनावणी करण्याची मागणी केली़ न्यायालयाने त्यांची याचिका मंजूर केली आहे़ ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या न्यायासनासमोर तृणमूल काँग्रेसची बाजू मांडली़.

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने शुक्रवारी ममता बॅनर्जी आणि ऋतब्रता बॅनर्जी या प्रतिस्पर्धी गटांना वेगवेगळी नावे आणि निवडणूक चिन्हे दिली होती. एक दिवस आधी आयोगाने या वादावर अंतिम निर्णय होईपर्यंत दोन्ही गटांना ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव वापरण्यास मनाई करणारा आणि निवडणूक चिन्ह गोठवणारा अंतरिम आदेश जारी केला होता.
सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋतब्रता बॅनर्जी यांना प्रतिवादी केले आहे. निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करत त्या म्हणाल्या, पक्षाची ओळख गमावण्याचे दुःख आपले मूल गमावलेल्या आईच्या वेदनेसारखेच आहे़ आम्ही ही अंतरिम व्यवस्था तडजोड म्हणून स्वीकारणार नाहीत़ पक्षाची मूळ ओळख व निवडणूक चिन्ह परत मिळवण्यासाठी शेवटपर्यंत राजकीय, लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले़