तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या चर्चेला पूर्णविराम?

म्हणाले, ‘पुढची बदली कुठे होईल, हे माझ्या हातात नाही’

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
मुंबई
tukaram mundhe अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत आहेत. त्यांनी एफडीएचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्यातील भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दूध आणि पनीरमधील भेसळीसह विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमधील गैरप्रकारांवर प्रशासनाने कारवाई केली असून, मोठ्या हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवायांमुळे तुकाराम मुंढे यांच्या कामाची राज्यभर चर्चा सुरू आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने काही बॉलिवूड कलाकारांनाही नोटिसा बजावल्या आहेत.
 

tukaram mundhe in focus amid maharashtra fda crackdown and transfer speculation 
मुंढे यांच्या कारवाईची चर्चा सुरू असतानाच काही काळापूर्वी त्यांच्या बदलीची शक्यता असल्याच्या बातम्यांनीही जोर धरला होता. तुकाराम मुंढे यांची बदली होऊ नये, अशी मागणी काही नागरिकांकडून करण्यात येत असल्याचेही समोर आले. कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची गय न करता नियमांनुसार कारवाई करण्याची त्यांची भूमिका असल्याने त्यांच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याचदरम्यान तुकाराम मुंढे यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना एफडीएमधून बदली झाल्यानंतर पुढे कोणता विभाग मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुंढे यांनी भविष्यातील नियुक्तीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
“पुढची बदली कुठे होईल, हे माझ्या हातात नाही. सरकारकडून जो विभाग दिला जाईल, त्या विभागात मी काम करेल,” असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बदलीच्या चर्चेदरम्यान त्यांनी कोणत्याही विशिष्ट विभागाची मागणी नसल्याचे या वक्तव्यातून स्पष्ट केले आहे. भविष्यातील पद किंवा बदली यापेक्षा सध्याच्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिकाही त्यांनी मांडली. “मी भविष्याचा फार विचार करत नाही. मी ज्या पदावर आहे, तिथे चांगले काम करून माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो,” असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने भविष्यातील चिंतेत अडकण्यापेक्षा वर्तमानात काम करण्यावर भर द्यायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही मुंढे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या मते, कोणतेही कर्मचारी किंवा अधिकारी कामचुकारपणा करत असतील, तर त्यांच्याशी तडजोड करण्याचे कारण नाही. अशा प्रकारच्या कामकाजाकडे सहानुभूतीने पाहण्याचीही आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, राज्यातील दूध भेसळीच्या प्रश्नावरही तुकाराम मुंढे यांनी भाष्य केले आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एफडीएच्या कारवाईत दूध आणि पनीरमधील भेसळ करणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत यापूर्वी अनेकदा बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक नव्या नियुक्तीबरोबरच बदलीच्या चर्चेलाही उधाण येत असते. सध्या एफडीएच्या कारवाईमुळे ते चर्चेत असतानाच पुन्हा एकदा त्यांच्या बदलीच्या शक्यतेची चर्चा रंगली होती. काही काळापूर्वी तर त्यांची थेट राजस्थानमध्ये बदली होणार असल्याची चर्चाही होती. त्या चर्चेवरही मुंढे यांनी यापूर्वी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, सध्याच्या घडीला एफडीएच्या माध्यमातून भेसळखोरीविरोधात सुरू असलेल्या कारवायांवर त्यांचा भर असल्याचे त्यांच्या वक्तव्यांतून दिसून येते. पुढील नियुक्ती किंवा बदलीचा निर्णय सरकारच्या पातळीवर होणार असून, आपल्याला दिलेल्या जबाबदारीत प्रामाणिकपणे काम करत राहणे, हीच आपली भूमिका असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.