कारंजा,
Vrikshamitra Familyवर्धा वनविभाग तर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्थानिक वृक्षमित्र परिवाराचे संस्थापक विलास वानखडे यांचा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वर्धा येथील विकास भवनात आयोजित कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपवनसंरक्षक हरवीर सिंग, सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक सुहास बढेकर उपस्थित होते.
विलास वानखडे यांनी वृक्षमित्र परिवारला वेळोवेळी सहकार्य करणारे देश-विदेशातील माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी कारंजा येथील नागरिक, स्नेहीमित्र मंडळी व इतरांना सदर सन्मान समर्पित केला आहे. भविष्यात नैसर्गिक व शुद्ध प्राणवायू उपलब्ध व्हावा या दृष्टीने वृक्षमित्र परिवार कारंजा घाडगेच्या माध्यमातून शहरातील सर्व शाळा, अंगणवाडी, पंचायत समिती, तहसील, पोलिस ठाणे, मंदिर परिसर, खुले मैदान, उद्यान, रस्ता दुभाजक, रस्त्याच्या कडेला तसेच निवासी परिसरात कोरोनानंतर आजपावेतो ८२५ वृक्षसंवर्धक कठडे (ट्री गार्ड) व विविध प्रजातीची रोपटे भेट देऊन वृक्षारोपण केले.
नागरिकांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी उचलली असून ८५ टक्क्यांवर झाडे जगविली आहेत. दरवर्षी वृक्षारोपण करून कारंजा शहर हरित शहर करण्याचा मानस वृक्षमित्र परिवारच्या माध्यमातून संस्थापक विलास वानखडे पुढे नेत आहे.