राजनीतीवर टवाळांची टोळधाड!

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
अग्रलेख...
indian politics सर्वसामान्य माणसे ज्याकडे राजनीती म्हणून पाहतात, त्यामधील नैतिकतेचा केव्हाच अस्त झाला असून राजकारणाची संस्कृतीदेखील आता लयास चालल्याने भविष्यात देशातील राजकारण कोणती वळणे घेणार याची चिंता करण्याची वेळ येऊ लागली आहे. एके काळी राजकारणाची संस्कृती जपली जात होती. विरोधाच्या राजकारणातही सभ्यतेची पातळी सांभाळली जात होती. त्यामुळेच, राजकारणाविषयी सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल, उत्सुकता आणि आपुलकीदेखील होती. काळ बदलत चालला, तसतसा सामान्यांच्या मनातून राजकारणाविषयीचा आदर उतरत चालला आणि राजकारण किंवा राजकारण्यांकडे पाहण्याची दृष्टीदेखील बदलत गेली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर किंवा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आरोप करणे, कुरघोडीचे राजकारण करणे ही राजकारणाची नीतीच असली तरीही त्या नीतीने आपल्या मर्यादा ओलांडल्या की रसातळाचा कोणता थर गाठला जातो, याचे ताजे उदाहरण लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी त्यांच्या ताज्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमातून देशासमोर उघड केले. गेल्या काही महिन्यांपासून ‘जेन-झी’ची मने जिंकण्यासाठी आणि त्याद्वारे मतांची बेगमी करण्यासाठी राहुल गांधींच्या माध्यमातून ‘छात्रों की गूंज’ नावाचा कार्यक्रम काँग्रेसद्वारे राबविला जात आहे. या कार्यक्रमात गोळा केल्या जाणाऱ्या गर्दीला ‘जेन-झी’ वयोमर्यादेची अट असतेच असे नाही.
 

indian politics 
 
त्यामुळे केवळ गर्दीसाठी जमविल्या जाणाऱ्या सरसकट जमावासमोर राहुल गांधी यांनी संवादाच्या नावाखाली जे काही विचार मांडले, त्याचा फारसा प्रभाव तरुणाईच्या मनावर पडलेला दिसत नाहीच, उलट त्यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमांच्या मालिकेनंतरही काँग्रेसच्या सावलीतील विद्यार्थी संघटनांनाच नाकारण्याची मानसिकता जेन-झी मध्ये बळावत असल्याचे अलिकडेच पार पडलेल्या दिल्ली विद्यापीठातील निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, राहुल गांधींना तरुणांसमोर आणून काँग्रेस मतांची बेगमी करते, की काँग्रेसपासून तरुणांनी दूर राहावे यासाठी आटापिटा करते, याचे उत्तर भविष्यात मिळणार आहे.
राजकीय विरोधाला विनोदाची फोडणी देणे ही लोकशाहीने दिलेली मोकळीक आहे की राजकारणातील गांभीर्याचा ऱ्हास आहे, हा प्रश्न मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज कार्यक्रमातील स्टँडअप काॅमेडियन पुलकित मणी याच्यासोबत झालेल्या ‘हास्यजत्रे’मुळे ऐरणीवर आला आहे. एकमेकांचा अवमान आणि एखाद्याच्या पदाचा उपहास यांच्यामध्ये एक सूक्ष्म सीमारेषा असते. ती सीमारेषा पुसली गेली की राजकीय टीका अखेरीस तमाशाचा फड बनतो आणि व्यंगांची मर्यादा भंग होऊन ते केवळ स्वस्त विनोदाच्या पातळीवर उतरतात. इंदूरच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमात नेमके हेच झाले, असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. ज्यांनी राहुल गांधी यांचा तो विनोदी कार्यक्रम पाहिला, प्रत्यक्ष अनुभवला, त्यांच्या मनातही याहून वेगळी भावना उमटली असेल असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लकबी, परदेशी नेत्यांसोबतच्या संवादाची शैली आणि काही शब्दांची खिल्ली यांचा आधार घेत इंदूरच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पुलकित होऊन सहभाग घेतला, तेव्हा लोकसभेतीलील विरोधी पक्षनेता या पदाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निश्चितच ऐरणीवर आला असेल. याआधीही एका जाहीर कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या संदर्भात अत्यंत घृणास्पद विनोद करून टीका केली तेव्हा जनतेमधील नापसंतीचा सूर बुहधा काँग्रेसपर्यंत पोहोचला नसावा. तसे असते, तर पुन्हा तसाच पांचट विनोद करून विद्यार्थ्यांना हसविण्याचा पोरकट प्रयत्न करण्याचा सल्ला राहुल गांधींच्या सल्लागारांनी त्यांना दिला नसता. आजची जेन-झी पिढी प्रगल्भ आहे, या पिढीच्या मनात व्यवस्थेविषयी काही स्पष्ट भावना आहेत आणि त्यामध्ये बदल घडविण्याचे ठोस मार्गदेखील त्यांच्यासमोर आहेत. अशा प्रगल्भ पिढीसमोर असे तिसऱ्या दर्जाचे हलके विनोद सादर करून त्यांद्वारे त्यांना आपलेसे करून घेण्याच्या प्रयत्नांत राजनीतीचे पतन आणि पक्षाच्या प्रतिमेवरील अविश्वासास हातभार लावण्यापलीकडे फारसे काही काँग्रेसच्या हाती लागण्याची शक्यता कमीच असतानाही, त्याच प्रकारांची पुनरावृत्ती करण्याचा अट्टहास ही विनाशकालातील विपरीत बुद्धी म्हणावी लागेल. काँग्रेसने राजनीतीची परंपरा जपली पाहिजे, त्या परंपरेला पोरकटपणाचाा स्पर्श होऊ देऊ नये आणि सभ्यतेच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत, अशी भावना असलेले अनेक निष्ठावंत काँग्रेसजन राहुल गांधींच्या या स्टँडअप कॉमेडीमुळे नाराज झालेले पाहावयास मिळतात. त्यांची भावना पक्षापर्यंत पोहोचेल किंवा नाही, याबाबत काहीच स्पष्टता नाही. तशी काही यंत्रणा काँग्रेसकडे असेलच असे दिसत नाही.
मुळात, राहुल गांधींच्या त्या वादग्रस्त मिमिक्रीचा वाद तेवढ्यापुरता मर्यादित नाही. राजकीय अभिव्यक्तीच्या बदलत्या संस्कृतीचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. राजकारणात विनोदास थारा नाही असे नाही. उलट सत्तेवर विनोद करणे हे राजकीय संस्कृतीच्या आणि लोकशाहीच्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. व्यंग हा तर सत्तेला दाखविला जाणारा आरसा असतो. राजकारणातील व्यंगाची परंपरा फार प्रगल्भ आणि जुनी आहे. व्यंगचित्रकार, साहित्यिक, कवी, लेखक आणि विनोदी कलावंतांनी आपल्या उच्च दर्जाच्या विनोदातून राजकीय व्यंगावर बोट ठेणारे सुसंस्कृत विचार मांडले आहेत.indian politics त्यामुळे, नव्या जमान्यातील मिमिक्री हा प्रकार राजकारणास निषिद्ध नसला, तरी व्यंगाचे सामर्थ्य त्याच्या आशयात असते, याचा विसर पडणे योग्य नाही. केवळ एखाद्याची देहबोली, आवाज किंवा लकबीतून त्यास हिणविणे म्हणजे विनोद नाही. धोरणांवर, निर्णयांवर, सत्तेच्या कार्यपद्धतीवर किंवा सार्वजनिक भूमिकांवर विनोद वा व्यंगाच्या माध्यमातून प्रहार झाले, तर ते धारदार शस्त्राप्रमाणे प्रभावी ठरतात. मात्र, व्यक्तीची थट्टा हाच विनोदाचा गाभा असेल, तर त्यातून दिल्या जाणाऱ्या राजकीय संदेशाविषयी संदेह निर्माण होतात. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या थट्टेचे प्रकार वाढीस लागले असून त्यामध्ये काँग्रेसने आघाडीवर राहण्याचा आटापिटा चालविला असावा असे दिसते. सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या देहबोलीची थट्टा करणारी मिमिक्री तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरातच सादर केली, तेव्हा त्यास भरभरून दाद देणाऱ्या काँग्रेस नेत्यांना या नीतीचे अनुकरण करण्याची कल्पना सुचली असावी. एखादे वैचारिक बौद्धिक किंवा धोरणात्मक चर्चा ऐकण्यासाठी लोकांना फारसा रस नसतो, मात्र काही सेकंदांचा विनोदी व्हिडीओ वेगाने समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. डिजिटल राजकारणातील या बदलामुळे विनोद, व्यंग आणि मीमसारख्या प्रकारांचा राजकारणातील प्रभाव वाढत चालला असला, तरी अशा विनोदास तरुणांकडून फारशी दाद मिळत नाही, असे गेल्या वर्षी झालेल्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. कारण आजच्या करमणुकीला किंवा मनोरंजनालादेखील माहितीचा आधार असावा लागतो, हे तरुणाईच्या मानसिकतेतून स्पष्ट झाले आहे. यामुळेच, केवळ ‘एन्टरटेन्मेंट’ किंवा करमणूक एवढेच आजच्या विनोदाचे अंग पुरेसे नाही. त्याला ‘इन्फोटेन्मेंट’ असे स्वरूप असले पाहिजे. म्हणजे, मनोरंजनास माहितीचा सज्जड आधार असावा अशी आजच्या माध्यमविश्वाकडून तरुणाईची अपेक्षा आहे. राजकारणासमोरील हे एक मोठे आव्हान असताना, काँग्रेस मात्र राहुल गांधींच्या माध्यमातून तरुणाईच्या माथी केवळ मनोरंजन मारणार असेल, तर त्याचे राजकीय परिणाम त्यांना दिसतील यात शंका नाही.