वर्धा
investors-defrauded शहरातील आर्वी नाका येथील पीव्हीआर मल्टिट्रेडिंग लॅब या फर्मच्या माध्यमातून ट्रेडिंग केल्यास गुंतवणुकीच्या रकमेवर परतावा देण्याचे आमीष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची १ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करणार्या फर्मच्या संचालकाचा साथीदार पुष्पक पटले रा. तिरोडा जि. गोंदिया याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

बोरगाव मेघे येथील विक्रम पर्बत हा आर्वी नाका परिसरात पीव्हीआर मल्टिट्रेडिंग लॅब ही फर्म चालवित होता. सदर फर्मच्या माध्यमातून ट्रेडिंग केल्यास गुंतवणूक रकमेवर परतावा देण्याचे आमीष दाखवून फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांकडून रकम स्विकारून त्याबाबतचे हमीपत्रही लिहून देत होता. गुंतवणूक केलेल्या रकमेवर सुरूवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. मात्र, काही कालावधीनंतर त्याने परतावा देण्यासाठी टाळाटाळ सुरू केली. यात त्याने ६२ लाख २ हजार रुपयाने फसवणूक केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच फिर्यादीने ८ ऑगस्ट २०२४ रोजी देवळी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता फसवणुकीची रकम १ कोटी ७ लाख ५० हजारांच्या घरात असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, या गुन्ह्यात यापूर्वी ९३ लाख ६ हजार ६४६ रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. तसेच फर्मचा संचालक मुख्य आरोपी विक्रम पर्बत याला १९ ऑगस्ट २०२५ रोजी अटक करण्यात आली. सध्या हा आरोपी वर्धा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तर विक्रम पर्बतचा साथीदार पुष्पक पटले हा बाहेर राज्यात राहुल वर्मा या बनावट नावाने वास्तव्यास होता. दरम्यान,पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने पुणे, छत्तीसगड रुट पॅटर्नचा अभ्यास करून शोध घेत त्याला छत्तीसगड राज्यातील दुर्ग, पुरानी भिलाई एकतानगर येथून अटक केली. न्यायालयात हजर केले असता २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली होती. त्याच्याकडून एम. एच. ३२ सी. ७७२१ क्रमांकाची कार, एक मोबाईल संच, दोन लॅपटॉप असा ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे, पोलिस उपअधीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर, निकेश गुजर, कुणाल डांगे, राजेश पाचरे, अंकित जिभे यांनी केली.