मातीचा देव त्याले पाण्याचा भेव...
साेन्या चांदीचा देव त्याला चाेराचा भेव
भंडारा,
bhandara-breaking-news या राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांच्या भजनाला साजेशी कामगिरी रात्रीच्या अंधारात एका चाेरट्याने केले. देव मातीचा हाेता, पण त्याच्या गळयातील नाेट्यांच्या हारावर चाेरट्याची नजर गेली अन् चाेरट्याने आपली माेहिम फत्ते केली. मंडपात दाेन कार्यकर्ते झाेपले हाेते, पण त्यांना याची भनकही लागली नाही. दबक्या पावलांनी आलेल्या चाेरट्याने नाेटांच्या हारासह एक माेबाईल घेउन पाेबारा केला. देवाची भीती चाेरट्याला वाटायला पाहिजे तर आज देवच चाेरांच्या भीतीच्या सावटात आहेत आणि लक्ष ठेवण्यासाठी असलेले सीसीटिव्ही व्यर्थ ठरले, असेच म्हणावे लागेल.

भंडारा शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळात ही घटना घडली. मागील अनेक वर्षांपासून या मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस परिसरातील नागरिक भक्तिभावाने बाप्पाची आराधना करतात. यंदाही मंडळात गणरायाची स्थापना करून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सुरू आहेत. भक्तांनी श्रद्धेने गणपती बाप्पाच्या गळ्यात नोटांचा हार अर्पण केला होता. रात्री मंडळातील दोन तरुण मंडपातच झोपले होते. दिवसभराचा गोंगाट ओसरल्यानंतर परिसरात शांतता पसरली होती. मात्र, याच शांततेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंडपात प्रवेश केला. मंडळाच्या मंडपातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसणारा प्रसंग अक्षरशः एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा आहे. चोरटा मंडपात प्रवेश केल्यानंतर काही वेळ थांबतो. दोन्ही तरुण झोपले असल्याची खात्री करतो. त्यानंतर थेट बाप्पाच्या मूर्तीजवळ जातो. कुठलाही आवाज होऊ नये, याची काळजी घेत बाप्पाच्या गळ्यातील नोटांचा हार काढतो.
हार हातात आल्यानंतरही त्याची नजर आजूबाजूला फिरत राहते. त्यानंतर तो झोपलेल्या तरुणाच्या दिशेने जातो. अगदी अलगदपणे त्याचा मोबाईल उचलतो. मोबाईल हातात आल्यानंतरही काही क्षण तो मंडपातच थांबतो आणि नंतर दबक्या पावलांनी बाहेर पडतो. चोरटा मंडपातून बाहेर पडत असतानाच झोपलेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाला अचानक जाग आली. मंडपात काहीतरी हालचाल झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने स्वतःचा मोबाईल तपासला. मात्र, त्याचा मोबाईल त्याच्या जवळच असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने शेजारी झोपलेल्या मित्राला उठवून ‘तुझा मोबाईल आहे का?’ अशी विचारणा केली. मित्राने मोबाईल शोधला असता त्याचा मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे दोघेही तातडीने मंडपाबाहेर आले आणि आजूबाजूला पाहणी केली. मात्र, तोपर्यंत चोरटा अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता. परिसरात शोध घेतला, तरी त्याचा कुठेही मागमूस लागला नाही.
यानंतर दुसऱ्या दिवशी मंडळातील कार्यकर्त्यांनी मंडपातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि मध्यरात्री घडलेल्या संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला. फुटेजमध्ये अज्ञात चोरटा दबक्या पावलांनी मंडपात शिरताना, गणपती बाप्पाच्या गळ्यातील नोटांचा हार काढताना, झोपलेल्या तरुणाचा मोबाईल उचलताना आणि त्यानंतर मंडपातून बाहेर पडताना स्पष्टपणे दिसून आला. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी फुटेज तपासल्यानंतरच रात्रीच्या अंधारात नेमका कोणता ‘खेळ’ झाला, हे स्पष्ट झाले.
चोरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘बाप्पाच्या मंडपातच चोरी करण्याची हिंमत कुठून आली?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध मंडळांमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. काही ठिकाणी कार्यकर्ते मंडपात मुक्कामी असतात. अशा परिस्थितीत चोरट्याने मंडपात घुसून हार आणि मोबाईल लंपास केल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्याने त्याच्या शोधाला मदत होण्याची शक्यता आहे. बाप्पाच्या गळ्यातील हार उतरवून आणि झोपलेल्या भक्ताचा मोबाईल उचलून पसार झालेला हा मध्यरात्रीचा ‘अदृश्य चोर’ आता पोलिसांच्या हाती कधी लागतो, याकडे सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.