नागपूर
nagpur-municipal-corporation गणपती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिका पूर्णपणे सज्ज झाली असून, विसर्जनाचे नियोजन करण्यासाठी शहरातील सर्व दहा झोनच्या क्षेत्र अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. नागरिकांना विसर्जनादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेने तलावांच्या परिसरासह विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ४५० कृत्रिम विसर्जन टँक उभारले आहेत. गणेशमूर्ती विसर्जित झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या मातीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
मनपा उपायुक्त राजेश भगत म्हणाले, “गणपती विसर्जनासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी शक्यतो कृत्रिम टँकचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे. मूर्ती विरघळल्यानंतर उर्वरित मातीचीही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.”
शहरात आता पीओपीच्या गणेशमूर्तींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मागील वर्षी विसर्जन झालेल्या मूर्तींपैकी सुमारे ९५ ते १०० टक्के मूर्ती मातीच्या होत्या. पीओपीच्या मूर्ती आढळल्यास त्यांची स्वतंत्रपणे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
महापौर, उपमहापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या संकल्पनेतून दहा झोनमध्ये १८ निर्माल्य रथ फिरविण्यात आले आहेत. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, संकलित निर्माल्य भांडेवाडी प्रकल्पात नेऊन त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी व्यक्तींसाठी फिरते विसर्जन टँक ही सुविधाही मनपाने सुरू केली आहे. संबंधित नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर हे फिरते टँक त्यांच्या घरी किंवा जवळच्या ठिकाणी पोहोचून विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.