अकोला
double-murder-case पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नी व मुलीची निर्घुण हत्या केल्या प्रकरणी आरोपी मनीष किसनराव म्हात्रे रा.संतोषी माता मंदिराजवळ हनुमान बस्ती, अकोला यास दोषी ठरवून न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.दुसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तेजवंतसिंग संधू यांनी मंगळवार, २२ रोजी हा ऐतिहासिक निर्णय दिला.
रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ एप्रिल २०२४ रोजी एएसआय संजय भगत यांना पहाटे स्टेशन डायरी अंमलदार यांनी फोन द्वारे माहिती दिली की, आरोपी मनीष म्हात्रे त्याच्या दोन चुलत भावासोबत पोलीस स्टेशनला आले असून त्याने त्याची पत्नी व मुलीला कुऱ्हाडीने वार करून जिवे मारून टाकले असे सांगत आहेत. माहितीच्या आधारे पीएसआय भगत यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली असता, तिथे आरोपीची पत्नी रश्मी मनीष म्हात्रे (३०) व माही मनीष म्हात्रे (९) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले व तिथेच एक कुऱ्हाड आणि लोखंडी सुरी रक्ताने माखलेली दिसली.
आरोपी हा मागील पाच वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे पत्नीपासून विभक्त राहत होता. व त्याची पत्नी मुलीसह मुंबई येथे राहत होती त्या दोघी आरोपीच्या चुलत भावाच्या मुलीचे लग्न असल्याने लग्न समारंभ करता आरोपीच्या घरी अकोला येथे आल्या होत्या, परंतु पत्नीच्या चरित्रावर संशय असल्याने आरोपीने रात्री झोपेत कुऱ्हाड व चाकूने हत्या केली. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील मंगेश मानकर, यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी केला.तसेच रामदास पेठ पोलिस ठाण्याचे पैरवी पोलिस हेड कॉन्स्टेबल, अजय वानखडे, सुनील दीपकवार, पैरवी अन्वर खान यांनी सहकार्य केले.
चौदा साक्षीदार तपासले
या प्रकरणात आरोपीचे वडील व शेजारी हे फितूर झाले होते.परंतु संबंधित प्रकरणात सरकार पक्षाने परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी जोडल्याने व वैद्यकीय पुरावे व न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या विश्लेषणाचा अहवाल आरोपीच्या विरुद्ध जात असल्याने न्यायालय निष्कर्षावर आले. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले.