सावली,
herdsman-killed-in-tiger-attack गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना तालुक्यातील सामदा-दागोबा परिसरातील कक्ष क्रमांक 1501 येथे सोमवार, 21 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हेमंत अशोक भुरसे (47) असे मृतक गुराख्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गुराखी हेमंत भुरसे नेहमीप्रमाणे आपली जनावरे चराईसाठी घेऊन सामदा-दागोबा परिसरात गेला होता. यावेळी कक्ष क्रमांक 1501 मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर गुराखी बेपत्ता झाल्याने त्याचा शोध घेण्यात आला. तब्बल चार ते पाच तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचार्यांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
सावली वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र व्याहाड खुर्द, बिट उपरी कक्ष क्रमांक 1512 येथे 16 सप्टेंबरला वाघाच्या हल्ल्यात वासुदेव वाकुडकर यांचा तर याच उपवनातील सामदा कक्ष क्रमांक 1501 येथे हेमंत अशोक भुरसे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चार दिवसात दोन गुराख्यांच्या मृत्यूने परीसरात व शेतकरी, नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
20 ट्रॅप कॅमेरे व वनकर्मचारी तैनात : विनोद धुर्वे
वनविभागाच्या वतीने परीसरात 20 ट्रप कॅमेरे लावण्यात आले असून, 30 ते 35 वनकर्मचारी व अधिकारी वाघाच्या व वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. वनविभागाकडून परिसरात जनजागृती करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी दिली.