अध्यात्मावर आधारित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड

२०० जिल्ह्यांत परीक्षा, पाच गटात देशव्यापी नोंदणी, तब्बल ३ कोटींच्या पुरस्कारांची घोषणा

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
अमरावती
olympiad विद्यार्थ्यांसह युवा पिढी आणि पालकांना भारतीय अध्यात्म, संस्कृती, दर्शन, संस्कार व परंपरेची ओळख करून देण्याच्या उद्देशाने देशात प्रथमच ‘इंटरनॅशनल स्पिरिच्युअलिटी ऑलिम्पियाड’ (ISO) आयोजित करण्यात येत आहे. देशव्यापी नोंदणीला गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे.
 

olympiad
 
ऑलिम्पियाडमध्ये वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्र, रामायण, भगवद्गीता, ऋषी व संत परंपरा तसेच जैन, बौद्ध, शीख आणि अन्य भारतीय दर्शन-चिंतन-पंथांचा समावेश असलेला अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. भारतेतर दर्शनांचाही स्वतंत्र अध्याय आहे. ‘अ से अध्यात्म’ आणि ‘ए फॉर अध्यात्म’ या हिंदी व इंग्रजी पुस्तकांच्या आधारे वस्तुनिष्ठ (MCQ) परीक्षा घेण्यात येणार आहे.
 
ISOमध्ये ग्रुप C, D, E1, E2 आणि F असे पाच वर्ग असतील. इयत्ता ६ ते ८, ९ ते १२, पदवी, पदव्युत्तर, संशोधन व डिप्लोमा विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही स्वतंत्र वर्ग ठेवण्यात आला आहे. नोंदणी वेबसाइट तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत करता येणार आहे.
ISO प्रीलिम्सची ऑफलाइन OMR परीक्षा २९ ऑगस्ट २०२७ रोजी देशातील ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे २०० जिल्ह्यांत एकाच दिवशी होणार आहे. ३० सप्टेंबर २०२७ रोजी निकाल जाहीर करून राष्ट्रीय व राज्य गुणवत्ता यादीतून एकूण ४८० विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. अंतिम परीक्षा दिल्ली येथे १३ डिसेंबरला होणार असून १४ व १५ डिसेंबरला पारितोषिक वितरण सोहळा होईल.
 
प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाला १० लाख रुपये, द्वितीयला ५ लाख, तृतीयला २.५ लाख, चतुर्थला २ लाख आणि पंचम क्रमांकाला १.५ लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, २०० जिल्ह्यांतील टॉपर्सना ट्रॉफी व पदके तसेच १ हजार शैक्षणिक संस्थांना संस्थात्मक पुरस्कार दिले जाणार आहेत.
 
पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती देताना शक्ती महाराज, डॉ. संतोष नवलानी, सीता दीदी, कथा वाचक रामप्रिया, सागर देशमुख महाराज, ISO कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकुमार जाजोदिया, राष्ट्रीय मुख्य संसाधन व्यक्ती रचना मेहरोत्रा, महाराष्ट्राच्या मुख्य संसाधन व्यक्ती सोनाली सिंग, डॉ. कुंजन वेद यांच्यासह विविध आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अधिक माहितीसाठी isocouncil.org या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.