मुंबई
katrina kaif body shaming अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या लोकप्रियतेची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, अनेक चित्रपटांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कतरिना रुपेरी पडद्यापासून दूर आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिने मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच तिच्या दिसण्याचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
कतरिनाच्या वाढलेल्या वजनावरून काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्यावर टीका करत बॉडी शेमिंग केले. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या व्हिडीओतील तिच्या दिसण्यावरून काही जणांनी तिला ट्रोल केले आहे. या प्रकारावर माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत महिलांच्या शरीरयष्टीवर, वजनावर किंवा दिसण्यावर टिप्पणी करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. महिलांना अशा टीकाकारांना कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वजन वाढणे किंवा कमी होणे, वय, रूप, शरीरयष्टी अथवा त्वचेच्या रंगावर टिप्पणी करण्यासाठी वेळ काढणाऱ्या व्यक्तींना उत्तर देण्याची गरज नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
कतरिनाचा उल्लेख करत प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले की, आज कतरिना असेल किंवा उद्या दुसरी कोणतीही व्यक्ती असू शकते; कोणालाही आपल्या आयुष्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे बंधन नाही. कारण ते प्रत्येकाचे स्वतःचे आयुष्य, शरीर आणि स्वतःच्या निवडी आहेत, असे त्यांनी आपल्या पोस्टमधून स्पष्ट केले.
प्रियांका चतुर्वेदी यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत कमेंट्स केल्या असून, त्यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
दरम्यान, कतरिनाच्या ट्रोलिंगच्या मुद्द्यावर यापूर्वी पाकिस्तानी अभिनेता अली जफर यानेही तिची बाजू घेतली होती. त्याने ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधत कतरिनाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. अभिनेता हृतिक रोशन, सलमान खान आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे.
मुलाच्या जन्मानंतर कतरिना सध्या चित्रपटांपासून दूर असली, तरी सोशल मीडियावरील तिच्या दिसण्यावरून सुरू झालेल्या चर्चेमुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विशेषतः अभिनेत्रीच्या शरीरावरून होणाऱ्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका चतुर्वेदी यांनी घेतलेली भूमिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.