सुरक्षित, सुविधाजनक विसर्जनासाठी मनपा सज्ज

मोठ्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जना संदर्भात तलावांची पाहणी

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
नागपूर,
municipal-corporation मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन श्रद्धापूर्वक, सुरक्षित आणि सुविधाजनक पद्धतीने पार पडावे, यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेचा रविवार (ता. २०) रोजी आमदार विकास ठाकरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मनपा आयुक्त डॉ. विपिन यांच्या उपस्थितीत पाहणी करून आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार विकास ठाकरे यांनी पोलिस लाईन टाकळी येथील कृत्रिम विसर्जन तलावाची पाहणी केली, तर मनपाचे सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर कच्छीविसा मैदान येथे उपस्थित होते.
 
municipal-corporation
 
यावेळी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठीची तयारी, नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक यंत्रणा व साहित्याची पाहणी करण्यात आली. विसर्जन प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित, पोलिस उपायुक्त श्रीमती अन्नपूर्णा सिंह, पोलिस उपायुक्त वाहतूक आदित्य मिलखेलकर, पोलिस उपायुक्त डॉ. संदीप पखाले, पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ, नगरसेवक अभिजित झा, नगरसेवक प्रमोद सिंह ठाकूर, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवप्रसाद पारवे, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी  तुषार बारहाते, अधीक्षक अभियंता विजय गुरुबक्षानी, विभागीय अधिकारी दीनदयाल टेंभेकर, सहाय्यक आयुक्त अशोक गराटे, कार्यकारी अभियंता  राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राठोड तसेच मनपा व पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
 
यावेळी पोलिस लाईन टाकळी, गोरेवाडा, कोराडी, कोलार आणि कच्छीविसा मैदान येथील मनपाने उभारलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, आवश्यक यंत्रणा व साहित्य तसेच मोठ्या मूर्तींची वाहतूक करण्यासाठीच्या मार्गांची पाहणी करण्यात आली. विसर्जनाच्या कालावधीत तलाव परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये आणि विसर्जन प्रक्रिया सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी आवश्यक वाहतूक नियंत्रण व पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
पाहणीदरम्यान काही ठिकाणी छोट्या आकाराच्या श्रीगणेश मूर्तींचेही विसर्जन होत असल्याचे निदर्शनास आले. याची दखल घेत छोट्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी संबंधित परिसराच्या जवळ अधिक संख्येने कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याबाबत मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मोठ्या आकाराच्या श्रीगणेश मूर्तींची संख्या लक्षात घेता, आवश्यकतेनुसार विसर्जनाच्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच क्रेन यंत्रणा कार्यरत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस अधिकाऱ्यांचा आवश्यक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
कच्छीविसा मैदान येथे होणाऱ्या श्रीगणेश मूर्ती विसर्जनादरम्यान मैदानाच्या क्रीडा सुविधांना कोणतीही हानी होणार नाही, याची विशेष काळजी घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. तसेच सर्व कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वेळेत सुनिश्चित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. मोठ्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनावेळी नागरिकांची गर्दी, वाहतूक, सुरक्षा, अग्निशमन, विद्युत व्यवस्था, क्रेन यंत्रणा तसेच आवश्यक मनुष्यबळ यांचा समन्वय साधून विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी या पाहणी दौऱ्यादरम्यान विविध विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले.