पेचकस पोटात भोसकून वडिलाचा खून

वीज बिलावरून वाद; मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime वीज बिल आणि घरखर्चावरून झालेल्या वादात मुलाने वडिलांच्या पोटात पेचकस (स्क्रू ड्रायव्हर) भोसकल्याची घटना लकडगंज परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी २३ वर्षीय मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. बाबा नानक स्कूलजवळील गरोबा मैदान परिसरातील प्लॉट क्रमांक ५०१ येथे १६ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली. बबलू सहारे (५६) असे मृताचे नाव असून तुषार बबलू सहारे (२३) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मृताची पत्नी ममता बबलू सहारे (४५) यांनी पोलिसांत तक्रार दिली.
 

nagpur crime son allegedly fatally stabs father with screwdriver during dispute over electricity bill 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू सहारे हे रोजंदारीवर काम करीत होते. घटनेच्या रात्री त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर वीज बिल भरणे आणि घरखर्चासाठी पैसे न देण्याच्या मुद्द्यावरून घरात वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर बबलू यांनी मुलगा तुषार याला पकडून त्याचा गळा दाबल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यात तुषार याने स्क्रू ड्रायव्हरने वडिलांच्या पोटावर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या बबलू यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी, २० सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सुरुवातीला अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने प्रकरण पुढील तपासासाठी लकडगंज पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी तुषारविरुद्ध गुन्हा दाखल केला.