अनिल कांबळे
नागपूर,
nagpur rapido driver रॅपिडो ॲपवरून बुक केलेली ऑटो राइड रद्द केल्याच्या कारणावरून ३६ वर्षीय महिलेला अश्लील व लैंगिक स्वरूपाचे संदेश पाठविल्याप्रकरणी रॅपिडो ऑटोचालकाविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहिल चौधरी असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने १९ सप्टेंबर रोजी घरी जाण्यासाठी रॅपिडो ॲपवरून ऑटो बुक केली होती. तिने ॲपवर पिकअपचे ठिकाण नमूद केले होते. मात्र, आरोपी चालक एमएच-४९ सीएफ-०३७७ क्रमांकाचा ऑटो घेऊन महिलेने दिलेल्या ठिकाणाऐवजी दुसऱ्याच ठिकाणी पोहोचला. यावरून महिलेचा चालकासोबत फोनवरून वाद झाला. चालक योग्य ठिकाणी न आल्याने महिलेने अखेर राइड रद्द केली. त्यानंतर आरोपीने रॅपिडोच्या इन-ॲप कम्युनिकेशन सुविधेचा वापर करून महिलेला कथितरीत्या अश्लील आणि लैंगिक आशयाचे संदेश पाठविले. या संदेशांमध्ये अश्लील पोहोचविणाऱ्या आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे आपली बदनामी व मानसिक त्रास झाल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले. त्यानंतर तिने प्रतापनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपी साहिल चौधरीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ व ३५२ तसेच एफआयआरमध्ये लागू करण्यात आलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ व ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास प्रतापनगर पोलिस करीत आहेत.