कपिलनगर हद्दीत समतानगर, खसाळा परीसरात कार्यक्रम संपन्न
अनिल कांबळे
नागपूर,
new police posts provide prompt service कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समतानगर आणि खसाळा येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दोन पोलिस चौक्यांचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात करण्यात आले. या दोन्ही चौक्यांमुळे परिसरातील नागरिकांना पोलिस सेवा अधिक सुलभ आणि तत्परतेने उपलब्ध होणार असून, गुन्हे प्रतिबंध, कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाला बळ मिळणार आहे.

समतानगर बीट क्रमांक २ येथे स्थापन करण्यात आलेल्या पोलिस चौकीच्या कार्यक्षेत्रात सुमारे ६० हजार नागरिकांची लोकसंख्या आहे. हा परिसर मिश्र लोकवस्तीचा असून रमाईनगर, सुगतनगर, कल्पनानगर, मेश्राम लेआउट, बाबा दीपसिंगनगर, गुरु तेगबहादूरनगर, मयूरनगर आणि नारी गाव या भागांचा त्यात समावेश आहे. मोठ्या लोकसंख्येच्या या परिसरात पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढल्याने नागरिकांना तक्रार नोंदविणे, पोलिस मदत मिळविणे तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अधिक प्रभावी यंत्रणा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, कपिलनगर पोलिस ठाण्याच्या बीट क्रमांक ४ अंतर्गत खसाळा येथेही स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्यात आली. या चौकीच्या कार्यक्षेत्रात खसाळा गाव, रजा टाऊन, लेंडे नगर, जगदंबा नगर, कवठा रोड, आमना टाऊन, आमिनाबाद, सुमन विहार सोसायटी, शकूर नगर आणि म्हसळा टोळी परिसराचा समावेश आहे.
खसाळा परिसरातून राष्ट्रीय महामार्ग जात असून सध्या या मार्गावर मेट्रोचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढली असून अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. महामार्गालगतची गावे आणि वसाहती असल्याने घरफोडी, वाहनचोरी तसेच अन्य चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचेही आव्हान पोलिसांसमोर आहे. नवीन चौकीमुळे या भागात पोलिसांची गस्त आणि उपस्थिती वाढवून गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासोबतच वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन पोलिस मदत अधिक वेगाने देणे शक्य होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता शाहू, पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सत्यवीर बंडीवार आणि कपिलनगरचे ठाणेदार सतीश आडे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.