मालमत्ता कर कमी करण्यासाठी दबाव; मनपाच्या कर निरीक्षकाला शिवीगाळ

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ३० हजारांची मागणी

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nmc मालमत्ता कराच्या फेरआकारणीच्या अर्जावरून महापालिकेच्या कर निरीक्षकाला जातीवाचक शिवीगाळ, धमकी देत ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूरज मोहन स्वामी (५७, रा. इंदोरा, जरीपटका) हे पाचपावली झोन-९ कार्यालयात कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते या कार्यालयात सेवा बजावत आहेत. तरविंदर सिंह मारवाह (६२, रा. काश्मिरी गल्ली) आणि प्रमोद भागचंदानी (५२, रा. पार्वती टॉवर, इंदोरा चौक, पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत.
 

nmc nagpur-property-tax-inspector-abuse-threat-30000-demand 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारवाह यांनी २६ जून २०२६ रोजी घराच्या मालमत्ता कराची फेरआकारणी तसेच महापालिकेच्या नोंदीतील मालकाच्या नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर दोन्ही आरोपी कर कमी करण्याच्या मागणीसाठी महापालिका कार्यालयात वारंवार येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. भागचंदानी हे इतरांच्या कामांसाठी महापालिका कार्यालयात वारंवार येऊन अधिकाऱ्यांवर काम करून घेण्यासाठी दबाव आणत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. अधिकारी आक्षेप घेतल्यास माहिती अधिकाराचा वापर करून अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती मागविणे आणि त्यांना त्रास देत पैशांची मागणी करण्याचा आरोपही करण्यात आला आहे. कर निरीक्षक स्वामी यांनी तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपींनी फोनवर तसेच प्रत्यक्ष कार्यालयात त्यांना शिवीगाळ केली. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत जातीवाचक अपशब्द वापरले. याशिवाय या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी ३० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.