अनिल कांबळे
नागपूर,
notorious criminal siriya arrested with two pistols शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या वाहनचोरीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपीकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, १४ जिवंत राऊंड, चार मॅगझिन, लाल रंगाची ॲक्टिव्हा आणि दोन मोबाइल असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. योगेश यादव ऊर्फ सिरिया (२८), रा. गवळीपुरा, सदर, नागपूर, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध सिताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

वाहनचोरीविरोधी पथकातील पोलिस हवालदार रोशन तिवारी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश यादव याच्याकडे पिस्तूल असून, तो त्याच्या लाल रंगाच्या ॲक्टिव्हा (एमएच-३१-एफजे-६७४७)च्या डिक्कीत बंदुकीच्या गोळ्या ठेवून फिरत आहे. तो सध्या धरमपेठ, सिताबर्डी येथील आनंद झेरॉक्स सेंटरजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता दोन देशी बनावटीची पिस्तुले, १४ जिवंत राऊंड आणि चार रिकामे मॅगझिन आढळून आले. आरोपी परिसरात पिस्तूल काढून हवेत फिरवत लोकांकडून खंडणी मागून दहशत निर्माण करीत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. काही दिवसांपूर्वी त्याने गोंडवाना चौक, खदान वस्ती परिसरातील अज्जू गाते या गुन्हेगारांकडून पिस्तुले विकत घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. २९ ऑगस्ट रोजी मकोसाबाग, लुंबिनी नगर परिसरातील आकाश राजन थापा याला तीन देशी बनावटीची पिस्तुले व राऊंड जप्त करण्यात आले होते. त्या प्रकरणातही योगेश यादव हा मुख्य आरोपी असून तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाहनचोरीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रोशन तिवारी, नितीन वर्मा, विलास कोकाटे, अजय शुक्ला, राहुल कुसरामे, अभय ढोणे, किशोर सोमकुवर, विवेक कावडकर या पथकाने ही कारवाई केली.