अमृतसर,
amritsar killing पंजाबमधील अमृतसर येथे सहाय्यक उपनिरीक्षक हरजीत सिंग यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून हरजीत सिंग यांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. या पार्श्वभूमीवर बॉर्डर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांनी पाकिस्तान सीमेलगतच्या जिल्ह्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, पोलीस कर्मचाऱ्यांनी घरातून ड्युटीवर जाताना तसेच ड्युटी संपल्यानंतर घरी परतताना गणवेश परिधान करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अमृतसर ग्रामीण, बटाला, गुरदासपूर आणि पठाणकोट या जिल्ह्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात संबंधित वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे या सूचना देण्यात आल्या आहेत. घरून पोलीस ठाणे किंवा ड्युटीच्या ठिकाणी ये-जा करताना कर्मचाऱ्यांनी साध्या वेशात प्रवास करावा, असे या निर्देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे. खासगी प्रवास करताना पोलीस कर्मचारी असल्याचे सहज लक्षात येईल, अशी कोणतीही खूण किंवा वस्तू सोबत ठेवू नये, अशीही सूचना करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या हालचालींचे नियोजन करताना सुरक्षेची काळजी घेऊन अनधिकृत व्यक्तींना त्याबाबत माहिती मिळणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
अमृतसरमधील भगतवाला धान्य बाजारात तैनात असलेले एएसआय हरजीत सिंग यांच्यावर पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हरजीत सिंग हे तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी होते. या प्रकरणाचा तपास सुरू असून, हत्याकांडातील एका संशयिताचा चकमकीत मृत्यू झाला आहे, तर दुसरा संशयित अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात या संशयितांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे समोर आले आहे.