अनिल कांबळे
नागपूर,
prison capacity राज्यात गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगारांना बंदिस्त ठेवण्यासाठी कारागृहात जागा अपुरी पडत आहेत. सद्यस्थितीत कारागृहाच्या क्षमतेपेक्षा जवळपास दीडपटीपेक्षा जास्त कैदी बंदिस्त आहेत. त्यामुळे कैद्यांचे आरोग्य आणि कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यातील कारागृहांची २७ हजार ४७४ कैद्यांची क्षमता असून प्रत्यक्षात ४१ हजार ८०९ कैदी बंदिस्त आहेत. म्हणजेच सद्यस्थितीत राज्यभरातील कारागृहांमध्ये १४ हजार ३३५ अतिरिक्त कैदी बंदिस्त असल्याने कारागृह व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेच्या तुलनेत सुमारे दीडपट कैदी असल्याने बंदिवानांच्या निवासाची व्यवस्था, आरोग्यसेवा, स्वच्छता, भोजन तसेच सुरक्षेच्या यंत्रणेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. कारागृहातील उपलब्ध जागेचा क्षमतेपेक्षा अधिक वापर होत असल्याने कैद्यांना पुरेशी जागा उपलब्ध करून देणे कारागृह प्रशासनासाठी कठीण ठरत आहे. कैद्यांची संख्या वाढल्याने आरोग्याच्या समस्याही गंभीर होण्याची शक्यता आहे. गर्दीच्या ठिकाणी संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्याचबरोबर प्रत्येक कैद्याच्या आरोग्याची नियमित तपासणी, उपचार आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेवर अतिरिक्त भार पडतो. कारागृहातील स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांवरही अतिरिक्त ताण येत आहे. दुसरीकडे कैद्यांची संख्या वाढल्यामुळे कारागृह सुरक्षेचे आव्हानही वाढले आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत कैद्यांची संख्या मोठी असल्याने बंदिवानांवर देखरेख ठेवणे, कारागृहातील शिस्त कायम राखणे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत.
नवीन कारागृहांची गरज
राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण पाहता नवीन कारागृहांची निर्मिती, विद्यमान कारागृहांच्या क्षमतेत वाढ तसेच मूलभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रियेला गती देणे, पात्र कैद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे आणि किरकोळ गुन्ह्यांतील आरोपींच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यावर भर दिल्यास कारागृहांवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.prison capacity कारागृह व्यवस्थेच्या विस्तारासोबतच कैद्यांचे आरोग्य आणि सुरक्षा यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.
..........
मोठी कारागृहे ‘ओव्हर क्राऊड’
राज्यात आठ मोठी कारागृहे असून त्यांची १६ हजार ४५ क्षमता असली तरी तब्बल २७ हजार ९७९ कैदी बंदिस्त आहेत. म्हणजेच ११ हजार ९३४ कैदी अतिरिक्त आहेत. सर्वाधिक कैदी पुण्यात (६३१६) तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक (३९३३) कारागृहात आहेत. तसेच तळोजा (३२२२), ठाणे (३३३०) आणि मुंबईत (३३९९), नागपूर (२८३६) कैदी बंदिस्त आहेत. राज्यात २७ हजार १९५ पुरुष तर ७७० महिला कैदी असून १४ तृतीयपंथीय कैद्यांचा समावेश आहे.