अनिल कांबळे
नागपूर,
ramdaspeth nagpur निर्धारित वेळेनंतरही सुरू असलेली दुकाने बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना शनिवारी रात्री सुमारे ११.५० वाजता रामदासपेठ परिसरातील बडेवाल अपार्टमेंटजवळ घडली. लोकेश सुनील कुलभेळे (२३, रा. गिरीपेठ, धरमपेठ) आणि गौतम विक्रम जयस्वामी (२३, रा. जनता हॉस्पिटलमागे, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई बसरुद्दीन अन्सारी (३९) हे रात्रीच्या ड्युटीवर सीआर मोबाईल गस्ती वाहनाचे चालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, रामदासपेठ परिसरातील काही व्यावसायिक आस्थापने निर्धारित वेळेनंतरही सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर अन्सारी यांच्यासह पोलिसांचे पथक रामदासपेठेतील बडेवाल अपार्टमेंट परिसरात पोहोचले. पोलिसांनी दुकानदारांना आस्थापने बंद करण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली. त्यावेळी लोकेश आणि गौतम यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला. दुकान बंद करू नये, असा आग्रह धरत दोघांनी पोलिसांशी वाद घातला. ‘सर्व दुकाने बंद केली तर सिगारेट कुठून घेणार?’ असा सवाल करीत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाद वाढल्यानंतर आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की करून शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. यावेळी पोलिसांना धमकावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई अन्सारी यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.