मुंबई
shah rukh khan गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची मोठी गर्दी होत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्ती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचत आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानेही पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान यांच्यासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले असून, त्याच्या या भेटीचे अनेकांनी कौतुक केले आहे.
शाहरुख खानचा बाप्पाच्या दर्शनाचा व्हिडीओ वृत्तसंस्था एएनआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख गणेशमूर्तीसमोर हात जोडून आशीर्वाद घेताना दिसत आहे. त्याने गणेशाच्या चरणी फुले अर्पण केली. त्यानंतर पत्नी गौरीसोबत त्याने बाप्पाची आरतीही केली. या भेटीवेळी शाहरुखचा मुलगा आर्यन खान तसेच धाकटा मुलगा अबराम खान कुटुंबासोबत दिसले नाहीत.शाहरुख खान प्रत्येक धर्माचा आदर करतो, अशी भावना त्याच्या चाहत्यांकडून अनेकदा व्यक्त केली जाते. त्यामुळे विविध धार्मिक सणांमध्ये त्याचा सहभाग किंवा त्यासंबंधीच्या कृती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. यावेळीही शाहरुखच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
मात्र, या भेटीदरम्यान सुहाना खानच्या एका कृतीनेही सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले. दर्शन घेत असताना सुहानाच्या कपाळाला कुंकू लागले. त्यातील काही कुंकू तिच्या डोळ्यात गेल्याने तिला डोळ्याला झोंबू लागले. त्यानंतर सुहाना आपल्या ओढणीच्या मदतीने डोळ्यात गेलेले कुंकू पुसताना दिसली. गौरी खाननेही मुलीला ते पुसण्यासाठी मदत केली.सुहानाच्या या कृतीचा काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी वेगळा अर्थ काढला. मात्र, उपलब्ध व्हिडीओतील दृश्यांनुसार तिने कपाळावर लागलेले कुंकू पुसलेले दिसत नाही. डोळ्यात गेलेल्या कुंकूमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठीच तिने ते पुसल्याचे दिसून येते. त्यामुळे सुहानाच्या या कृतीबाबत सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेची वस्तुस्थिती वेगळी असल्याचे स्पष्ट होते. अनेक चाहत्यांनी तिच्या या कृतीचे कौतुकही केले आहे.
यावेळी शाहरुख आणि गौरी यांच्या पोशाखानेही लक्ष वेधून घेतले. गौरी खान पिवळ्या रंगाच्या सूट-सलवारमध्ये पारंपरिक वेशभूषेत दिसली, तर शाहरुखने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. सुहाना खानने बॉटल ग्रीन रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिघांच्याही पारंपरिक लूकची सोशल मीडियावर चर्चा झाली.
दरम्यान, शाहरुख खानच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ या निवासस्थानी गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्तींसोबत कुराण शरीफही ठेवण्यात आल्याचा उल्लेख यापूर्वी समोर आला आहे. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द इनर अँड आउटर वर्ल्ड ऑफ शाहरुख खान’ या डॉक्युमेंटरीमध्ये शाहरुखच्या घरातील आतील भागाची काही दृश्ये दाखवण्यात आली होती. त्यामध्ये घरात गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवीच्या मूर्तींसोबत कुराण शरीफ ठेवलेले असल्याचे दिसले होते. ‘मन्नत’ची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते आणि शाहरुखचे हे निवासस्थान एखाद्या महालापेक्षा कमी नसल्याची चर्चा कायम असते.