तनुजा यांचे वैवाहिक आयुष्य चर्चेत

शोमू मुखर्जींपासून विभक्त राहिल्या, पण घेतला नाही घटस्फोट

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
मुंबई
tanuja अभिनेत्री काजोलने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आई तनुजा यांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने चित्रपटसृष्टीत यश संपादन केले. मात्र, काजोलची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनीही आपल्या काळात अभिनयाच्या क्षेत्रात मोठी लोकप्रियता मिळवली होती. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत पडदा शेअर करणाऱ्या तनुजा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. व्यावसायिक आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या तनुजा यांच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ-उतार आले.
 

tanuja married life separated from shomu mukherjee but never divorced 
तनुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर त्यांचे नाव प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांच्यासोबत जोडले जाते. ‘एक बार मुस्कुरा दो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९७२ मध्ये दोघांची पहिली भेट झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. जवळपास वर्षभराच्या नात्यानंतर १९७३ मध्ये तनुजा आणि शोमू मुखर्जी यांनी विवाह केला.
लग्नानंतर या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. त्यांची मोठी मुलगी काजोल असून धाकटी मुलगी तनिषा मुखर्जी आहे. मात्र, विवाहानंतर काही वर्षांनी तनुजा आणि शोमू मुखर्जी यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाले. दोघांनीही अखेर वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, विभक्त राहूनही या दोघांनी अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला नाही. शोमू मुखर्जी यांचे २००८ मध्ये निधन झाले.तनुजा यांच्या कारकिर्दीतील आणखी एक किस्साही अनेकदा चर्चेत येतो. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘चांद और सूरज’ या १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेली एक घटना त्यांनी नंतर स्वतः सांगितली होती.फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत तनुजा यांनी सांगितले होते की, चित्रीकरणादरम्यान एका प्रसंगी धर्मेंद्र त्यांच्याशी फ्लर्ट करू लागले. त्यामुळे त्या संतापल्या आणि त्यांनी धर्मेंद्र यांच्या कानशिलात लगावली. त्यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांना ‘निर्लज्ज’ असेही म्हटल्याचे तनुजा यांनी मुलाखतीत सांगितले होते. ‘मी तुझ्या बायकोला ओळखते. माझ्याशी फ्लर्ट करण्याची तुझी एवढी हिंमत कशी झाली?’ अशा शब्दांत त्यांनी त्यांना सुनावल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
चित्रपटांमधील दमदार अभिनयासोबतच तनुजा यांच्या आयुष्यातील हे प्रसंगही त्यांच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरले. एकीकडे पडद्यावर विविध भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले, तर दुसरीकडे खासगी आयुष्यातील आव्हानांनाही त्यांनी सामोरे जात आपली स्वतंत्र ओळख कायम राखली.