तेहरान,
will-hormuz-open-in-7-days अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेहरानकडून चर्चेचा मार्ग पुन्हा खुला करण्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेने लष्करी दबाव कमी करण्यासाठी सुरुवातीची पावले उचलल्यास सात दिवसांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची तयारी इराणने दर्शविल्याचे वृत्त आहे. हा प्रस्ताव मध्यस्थ देशांच्या माध्यमातून अमेरिकेपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रस्तावाचा उद्देश दोन्ही देशांमधील शत्रुत्व कायमस्वरूपी संपवण्यासाठी पुन्हा चर्चा सुरू करणे हा असल्याचे सांगण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी इराणचे प्रतिनिधी न्यूयॉर्कमध्ये असताना मध्यस्थ देशांसोबत या प्रस्तावावर चर्चा करण्याची तेहरानची योजना आहे. मात्र, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट भेट होण्याची शक्यता इराणी अधिकाऱ्याने नाकारली आहे. अमेरिकेकडून गांभीर्य आणि ठोस पावले दिसून आल्यास पुढील चर्चेतून कराराच्या दिशेने मार्ग काढता येऊ शकतो, असे इराणकडून सांगण्यात आले आहे.
इराणच्या म्हणण्यानुसार, त्याच्या बंदरांवरील नाकेबंदी हटवणे आणि होर्मुझ परिसरातील अमेरिकेच्या लष्करी हालचाली कमी करणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर सामुद्रधुनी पुन्हा खुली करून चर्चेला सुरुवात करण्याची तयारी इराणने व्यक्त केली आहे. या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याने ऊर्जा बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. यापूर्वी इराणने चर्चेसाठी काही अटी मांडल्या होत्या. त्यात युद्ध थांबवणे, गोठवलेली इराणी मालमत्ता मुक्त करणे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटवणे यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या प्रस्तावाबाबत इराणमधील फर्स वृत्तसंस्थेने वेगळी भूमिका मांडली आहे. रॉयटर्स आणि क्योडोच्या वृत्तांमध्ये इराणकडून होर्मुझ सात दिवसांत खुली करण्याचा प्रस्ताव दिल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी फर्सने अशा वृत्तांना चुकीचे आणि असत्य ठरवले आहे. त्यामुळे प्रस्तावाच्या नेमक्या स्वरूपाबाबत सध्या परस्परविरोधी दावे समोर येत आहेत.