सावली
domestic dispute तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या केशरवाही येथे घरगुती वादातून लहान भावाने मोठ्या भावावर काठीने डोक्यावर जबर मारहाण केली. यात मोठा भाऊ गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपूर येथे भरती केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आशिष भोयर (25) असे मृतकाचे नाव आहे. तर, आरोपी लहान भावाचे रुपेश भोयर असे नाव आहे.
केशरवाही येथील आशिष भोयर आणि रुपेश भोयर या दोन सख्ख्या भावात नेहमीच घरगुती व इतर काही कारणांमुळे वाद होत होते. सोमवारी रात्री याच वादाचे पर्यवसान गंभीर हल्ल्यात झाले. लहान भाऊ रुपेशने काठीने आशिषच्या डोक्यावर मागून जबर मारहाण केली. यात आशिष हा गंभीर जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचारासाठी सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. तिथेही त्याची अवस्था अतिशय गंभीर असल्याने तिथून नागपूर येथे हलविण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनाक्रमात लहान भाऊ रुपेश व आई त्याच्यासोबतच असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच सावली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.