शिलाँग,
8 UDP MLAs join BJP मेघालयच्या राजकारणातून भाजपसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (UDP) १२ पैकी तब्बल ८ आमदार भारतीय जनता पक्षावासी झाले आहेत. ख्लियातचे आमदार केरमेन शिला यांच्या नेतृत्वाखाली या सर्व आमदारांनी दिल्लीत भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाची भेट घेतली. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून कोळसा खाणकाम आणि संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये खासी भाषेचा समावेश करण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा आणि आश्वासन मिळाले आहे. याआधी माजी आमदार आणि यूडीपी नेते डॉ. जेमिनो मावथोह यांनी १२ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

या राजकीय घडामोडीनंतर दिल्लीत एका विशेष पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी अधिकृत घोषणा केली. मेघालयातील आठ यूडीपी आमदारांच्या पक्षप्रवेशाच्या बैठकीत बोलताना किरेन रिजिजू यांनी सांगितले की, मेघालयातील हे सर्व आठ लोकप्रिय आमदार आज अधिकृतपणे भाजप परिवारात सामील होत आहेत. ही केवळ ईशान्य भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राजकारणासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे. त्यांनी मेघालय विधानसभेचे हे आठही निवडून आलेले आमदार आणि आपले मित्र यांचे भाजप परिवारात मनापासून स्वागत केले. हे सर्व आमदार यापूर्वी यूडीपी या प्रमुख प्रादेशिक पक्षाशी संबंधित होते.
किरेन रिजिजू यांनी पुढे स्पष्ट केले की, गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारत आणि मेघालयमध्ये झालेली अभूतपूर्व प्रगती व बदल, नरेंद्र मोदींचे ईशान्य भारतातील जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि ज्या पद्धतीने भाजपने या भागातील विकासाच्या राजकारणात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे, या सर्व गोष्टींनी या आठही आमदारांना मनापासून प्रभावित केले आहे. ते पंतप्रधान मोदी आणि भाजप-प्रणित सरकारच्या विकासकामांपासून अत्यंत प्रेरित होऊन पक्षात आले आहेत. विशेष म्हणजे, ६० सदस्यीय मेघालय विधानसभा निवडणुकीत यापूर्वी भाजपचे केवळ दोनच आमदार होते. आता यूडीपीचे तब्बल आठ आमदार अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झाल्यामुळे मेघालय विधानसभेतील भाजपच्या आमदारांची संख्या थेट १० वर पोहोचली आहे.