नागपूर,
aapli bus nagpurशहर बस सेवेतील डिजिटल तिकीट प्रणालीत नागपूर महाराष्ट्रातील आघाडीचे शहर, तर देशातील अग्रगण्य शहरांपैकी एक म्हणून पुढे आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या 'आपली बस' सेवेची दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे २.३७ लाखांवर पोहोचली असून, यापैकी ४१.०३ टक्क्यांहून अधिक प्रवासी आता डिजिटल माध्यमातून तिकीट घेत आहेत.
हा टप्पा महानगरपालिका परिवहन समिती मा सभापती श्रीमती मंगला खेकरे, मा. आयुक्त डॉ विपीन , परिवहन व्यवस्थापक आणि मनपा परिवहन विभागाच्या संपूर्ण चमूच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.
मा. पंतप्रधानांच्या 'डिजिटल इंडिया' संकल्पनेतून प्रेरित प्रणाली अंतर्गत रोख व्यवहार कमी झाल्याने भाडे वसूली व महसूल व्यवस्थापनात पारदर्शकता येते, गळती थांबते आणि प्रवाशांचे बसमध्ये चढणेही जलद होते. व्यापक दृष्टीने पाहता, प्रत्येक डिजिटल व्यवहार देशाची औपचारिक अर्थव्यवस्था बळकट करतो.
"हे यश नागपूरकर जनतेचे आहे," असे परिवहन समितीचे सभापती श्रीमती मंगला खेकरे म्हणाले. "डिजिटल पेमेंटचा स्वीकार करून नागपूर, महाराष्ट्र आणि भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या प्रत्येक नागपूरकराचे आणि 'आपली बस'च्या प्रत्येक प्रवाशाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. 'आपली बस' अधिक सोयीस्कर, विश्वासार्ह आणि पूर्णतः डिजिटल करण्यासाठी आमचे प्रयत्न अविरत सुरू राहतील."
स्थानिक, राज्य व केंद्र स्तरावरील सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठबळ देणाऱ्या महापौर सौ. निता ठाकरे आणि स्थायी समिती सभापती सौ. शिवानी दाणी-वखरे, तसेच वरिष्ठ नेतृत्वाने मनपावर सोपविलेले प्रत्येक ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी मोलाचे योगदान देणारे मनपातील सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे सभापतींनी विशेष आभार मानले.
'आपली बस'ने प्रवास करताना डिजिटल पेमेंटचाच वापर करावा आणि सशक्त, कॅशलेस राष्ट्रनिर्मितीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेने सर्व नागरिकांना केले आहे.