कारंजा लाड,
murder ब्राह्मणखेड शिवारातील शेतमजुराच्या खून प्रकरणातील फरार आरोपीला कारंजा शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत मध्य प्रदेशातून ताब्यात घेतल्याने तपासातील तत्परता पुन्हा अधोरेखित झाली आहे. आरोपी दिनेश रामू उईके याला २२ सप्टेंबर रोजी सकाळी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्राह्मणखेड शिवारातील सर्व्हे क्रमांक १७/२ मधील शेतात २० सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास दोन मजुरांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून दिनेश उईके याने सोबत असलेल्या युवराज धुराडी वरखडे (वय ४०) , रा. ठिंदवाडा, ता. मुलताई, जि. बैतूल, मध्य प्रदेश यांच्या डोयात लोखंडी सब्बलने वार केल्याचा आरोप आहे. या घटनेत युवराज यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शेतातील खड्ड्यात पुरून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी मध्य प्रदेशाच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर रवाना झाले. सातत्याने शोध घेत अवघ्या पाच तासांत आरोपी दिनेश उईके याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सकाळी त्याला अधिकृतरीत्या अटक करण्यात आली.या प्रकरणातील तपासात मृताची ओळख युवराज वरखडे अशी पटली आहे. खुनामागील नेमका घटनाक्रम, वापरण्यात आलेले हत्यार, मृतदेह पुरण्यामागील कारण तसेच अन्य बाबींचा तपास पोलिस करीत आहेत. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात कारंजा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन खुनांच्या प्रकरणांचा तपास करून आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासात कारंजा शहर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेची चर्चा होत असून, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमर चोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप अल्लापुरकर, पोलिस उपनिरीक्षक विशाल एस. बोरकर तसेच पोलिस अंमलदार गणेश जाधव, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बिबेकर, मोहम्मद परसुवाले, नितीन पाटील, अनिस निनसुरवाले व अमित भगत यांनी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप अल्लापुरकर करीत आहेत.