मुंबई
afratfari traile एक कोटी रुपयांची रक्कम आणि त्याभोवती फिरणारे नातेसंबंध, स्वार्थ, गैरसमज आणि डावपेच यांची गंमत ‘अफरातफरी’ या आगामी मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातून तीन भावांच्या आयुष्यात एक कोटी रुपयांमुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी तिघे भाऊ कोणत्या युक्त्या करतात आणि त्यांच्या प्रयत्नांमधून कोणते विनोदी प्रसंग घडतात, याची उत्सुकता ट्रेलरने वाढवली आहे.
ट्रेलरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या व्यक्तिरेखांचे विविध पैलू समोर येतात. एक कोटींची रक्कम मिळवण्याची धडपड आणि त्यासाठी परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याचे सुरू असलेले प्रयत्न यामुळे कथानकातील गोंधळ अधिकच वाढताना दिसतो. पैशांच्या हव्यासातून तीन भावांमध्ये नेमके कोणते मतभेद निर्माण होतात, त्यांचे डाव एकमेकांशी जुळतात की प्रत्येकजण स्वतंत्रपणे आपली खेळी करतो, याची उत्सुकता ट्रेलरमुळे निर्माण झाली आहे.
कथेतील अनेक महत्त्वाच्या घटनांचे संकेत ट्रेलरमध्ये देण्यात आले असले तरी त्यामागची पूर्ण उत्तरे मात्र जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. तात्यांच्या मृत्यूचे खरे कारण काय, एक कोटी रुपयांची पॉलिसी अखेर भावांच्या हाती येते का, पैशांसाठी सुरू झालेली ही धावपळ कोणत्या टप्प्यावर पोहोचते आणि या सगळ्या खेळात कोण कोणाला गंडवते, असे अनेक प्रश्न ट्रेलरनंतर उपस्थित होतात. विनोद, गैरसमज, पैशांचा मोह आणि तीन भावांची धावपळ यांचा मेळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
कलाकारांच्या संवादांमधून afratfari traile आणि विविध प्रसंगांतून निर्माण होणारा विनोद कथानकातील गोंधळाला आणखी रंगत आणतो. मात्र या हास्याच्या वातावरणामागे एक कोटी रुपयांची रक्कम नेमकी कोणाच्या वाट्याला येणार, हा प्रश्न चित्रपटाबद्दलची उत्सुकता कायम ठेवतो.चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे यांनी सांगितले की, टिझरमधून ‘अफरातफरी’ची सुरुवात दाखवण्यात आली होती, तर ट्रेलरमध्ये या गोंधळामागची गंमत आणि पात्रांची धावपळ अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक कोटी रुपयांची रक्कम कथेतल्या प्रत्येक पात्राच्या निर्णयाला वेगळी दिशा देते. प्रत्येकाला आपलीच खेळी योग्य असल्याचे वाटत असले तरी या डावपेचांचा शेवट कुठे होतो, हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रेलरमधील प्रत्येक प्रसंगाकडे एका कोड्याप्रमाणे पाहावे, कारण पुढच्या क्षणी काय घडेल याचा अंदाज बांधणेही प्रेक्षकांसाठी मजेदार ठरेल, असेही कवडे यांनी नमूद केले. या सगळ्या गोंधळातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित ‘अफरातफरी’ची निर्मिती अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज यांनी केली असून, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सचे सहकार्य लाभले आहे. हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.