चेन्नई,
aircraft-engine-fails व्हिएतनाममधील हो चि मिन्ह सिटीहून श्रीलंकेतील कोलंबोला जाणाऱ्या व्हिएतजेट एअरलाइन्सच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, विमानाला चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व १५२ प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. व्हिएतजेट एअरचे विमान व्हिएतनाममधील हो चि मिन्ह सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मंगळवारी सायंकाळी श्रीलंकेची राजधानी कोलंबोसाठी निघाले. या विमानात १४३ प्रवासी आणि ९ कर्मचारी होते.
विमान श्रीलंकेच्या दिशेने अंदाजे ३६ हजार फूट उंचीवर उडत होते. मंगळवारी रात्री चेन्नईजवळून जात असताना, विमानाचे एक इंजिन अचानक निकामी झाले आणि बंद पडले. धोका लक्षात येताच वैमानिकाने जवळच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वैमानिकाने दिल्लीतील आपल्या एअरलाइनच्या मुख्यालयामार्फत चेन्नई विमानतळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्याने आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली आणि सुरक्षित लँडिंगसाठी सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली.
विमान सुरक्षित उतरताच सर्वांना साेडला सुटकेचा निःश्वास
माहिती मिळताच चेन्नई विमानतळ नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी तात्काळ सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली. त्यानंतर त्यांनी रात्री सुमारे १०:३० वाजता विमानाला उतरण्याची परवानगी दिली. रात्री १०:४० वाजता विमान चेन्नई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले़ त्यामुळे विमानतळ नियंत्रण कक्षातील अधिकारी, व्हिएतजेट एअरचे वैमानिक आणि विमानातील सर्वांना सुटकेचा निःश्वास साेडला.