सिंदी (रेल्वे),
sindi-railway महसूल व वन विभागाच्या २२ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार सिंदी (रेल्वे) येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सिंदी (रेल्वे) महसूल मंडळाचा समावेश राहणार असून आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

सिंदी (रेल्वे) येथील नागरिकांची ही अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी मार्गी लागावी, यासाठी आमदार समीर कुणावार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. याच अनुषंगाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेऊन सिंदी (रेल्वे) येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज या प्रयत्नांना यश मिळाल्याचे विशेष समाधान मिळाल्याच्या भावना आमदार कुणावार यांनी व्यत केल्या आहेत. या निर्णयामुळे सिंदी (रेल्वे) परिसरातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध शासकीय कामांसाठी होणारी गैरसोय कमी होऊन स्थानिक पातळीवर अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी प्रशासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. अनेक वर्षांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अपर तहसीलदार कार्यालयास मंजुरी मिळाल्याबद्दल नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.