आजीच्या डोक्यात 'क्राइम पेट्रोल'

अपहरण झाले? पोलीस आले, नातू सापडला मोबाईल खेळत पलंगाखाली!

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
भंडारा,
Bhandara kidnapping news घराबाहेर उभी असलेली एक संशयास्पद पांढरी गाडी, काही क्षणांत गायब झालेला अडीच वर्षाचा नातू, आजीची उडालेली भंबेरी आणि थेट पोलिसांपर्यंत पोहोचलेलं अपहरणाचं नाट्य... एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल असा हा थरार नुकताच एका घरात घडला. मात्र, या सगळ्या हायव्होल्टेज ड्रामाचा शेवट अत्यंत मजेशीर आणि हसून हसून पोट दुखवणारा असा झाला. ज्याच्या शोधासाठी पोलीस लागले, कुटुंबीयांसह शेजारीपाजारी चिंतेत बुडाले तो नातू मात्र चक्क पलंगाखाली मोबाईल खेळताना सापडला! घरातच सापडलेला नातू सगळ्यांसाठी जीव भांड्यात टाकणारा होता मात्र तेवढाच हा प्रसंग हसून पोट दुखावणाराही आहे. आजीच्या डोक्यातील "क्राइम पेट्रोल"ने ज्या काही अपहरणाच्या कल्पना केल्या ते अतिरेकापेक्षा कमी नव्हते. या सर्व घडामोडींपासून मोबाईल वेडा नातू मात्र नामानिराळा होता.
 
 

24346 
 
एखाद्या चित्रपटाच्या कथानकात शोभावा असा प्रसंग भंडारा शहरात घडला आणि त्याची मजेदार चर्चा सुरू झाली. जे काही झाले ते काळजीतून झाले, असे असले तरी काळजीचा अतिरेक आणि सततच्या अफवांवरील विश्वास यामुळे हे घडल्याचे बोलल्या जाते. घरातील आई-वडील कामानिमित्त बाहेर पडले की नातवाची जबाबदारी आजची असते. प्रत्येकच आजी आपल्या नातवाची तेवढ्याच सक्षमपणे काळजीही घेते. अशाच काळजीतून घडलेला एक प्रसंग संपूर्ण पोलीस यंत्रणेला कामी लावून गेला. भंडारा शहरातील प्रगती कॉलनी परिसरातील एका कुटुंबातील आई-वडील कामानिमित्त बाहेर पडले. यावेळी त्यांचा ओडीस वर्षाचा मुलगा आजी सोबत घरी होता. दोघेही काही वेळ हॉलमध्ये छान वेळ घालवत होते. दरम्यान, काही घरगुती कामानिमित्त आजी अवघ्या काही मिनिटांसाठी आतल्या खोलीत गेली. काम आटोपून आजी जेव्हा हॉलमध्ये परतली, तेव्हा तिथलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हॉल रिकामा होता, नातू गायब झाला होता! आजीने अख्खं घर डोक्यावर घेतलं, पण कुठूनच प्रतिसाद आला नाही. त्याच दरम्यान आजीने बाहेर डोकावले. अगदी त्याच वेळी घरासमोर एक पांढऱ्या रंगाची गाडी संशयास्पदरीत्या उभी होती आणि नंतर वेगाने निघून गेली. आधीच घाबरलेल्या आजीच्या डोक्यात थेट 'क्राईम पेट्रोल' सुरू झाले.
 
 
 
नातवाचं अपहरण झालं असावं, असा विचार आला आणि गोंधळ सुरु झाला. झालेला प्रसंग मुलाला सांगितला आणि मग तो पोलिसांपर्यंत पोहचला. अपहरण झाल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत गेले. तेथून पोलीस अधीक्षकांनी नुरूल हसन यांनी भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांना सांगितले. ताफ्यासह पोलीस पोहोचले आणि मुलाची शोधाशोध सुरू झाली. विषय नाकाबंदी करण्यापर्यंत गेला. सर्व खटाटोप सुरू असतानाच हॉलमधील दिवाणाखाली एकाने वाकून पाहिले आणि तिथे जे दिसले, त्याने उपस्थित सर्वांचेच डोके चक्रावून गेले! ''बालराजे' तिथे अत्यंत आरामात पलंगाखाली मोबाईल पाहण्यात गुंग होते. बाहेर आपल्यासाठी पोलीस आलेत, घरच्यांची भांबेरी उडाली आहे याची या महाशयांना साधी पुसटशी कल्पनाही नव्हती! कल्पित अपहरण नाट्याची आणि शोध कार्याची अखेर दिवानाखाली नातू सापडताच सांगता झाली. मात्र यासाठी राबलेली यंत्रणा आणि झालेली धावपळ व्यर्थचं ठरली. नातू सुखरूप सापडल्याने आजीच्या जिवात जीव आला, पण त्याच वेळी मोबाईलच्या वेडापाई नातवाने सर्वांना कामाला लावण्याचा प्रसंग पाहून पोलिसांसह सर्वांना हसू आवरले नाही. पांढऱ्या गाडीचा आणि या अपहरणाचा काहीही संबंध नव्हता, तो निव्वळ एक योगायोग ठरला. मात्र सतत कानावर येणाऱ्या अपहरणाच्या अफवा आणि कोणतीही खात्री न करता त्यावर ठेवला जाणारा विश्वास यातूनच आजीच्या डोक्यात क्राइम पेट्रोल जागे होऊन दिवाणा खालचा नातू अपहरणापर्यंत पोहोचला. अशा अफवांवर विश्वास न ठेवता पूर्ण खात्री करूनच कुठल्याही निर्णयावर पोहोचावे व प्रसंगी पोलिसांची मदतही घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.
...