सिरोंचा
bicycle-journey-for-voiceless-creatures ‘सेव्ह निमल, सेव नेचर’चा संदेश घेऊन मूकजीवांच्या रक्षणासाठी तब्बल 20 हजार किलोमीटरची सायकल यात्रा करणार्या प्राणिप्रेमी संदेश गुप्ता याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. मंचेरियल जिल्ह्यातील चेन्नूर येथून सुरू झालेली ही साहसी सायकल यात्रा विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देत जनजागृती संदेश घेऊन मार्गक्रमण करीत आहे.
मंचेरियल येथील ‘फ्रेंड्स निमल ट्रस्ट’च्या माध्यमातून ही सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे. प्राण्यांवरील प्रेम आणि रस्त्यावरील मूकजीवांच्या सुरक्षेबाबत समाजामध्ये जनजागृती करणे, हा या यात्रेमागील मुख्य उद्देश आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या श्वानांसह अन्य प्राण्यांचे मृतदेह अनेकदा रस्त्यावरच पडून राहतात. त्यानंतर वाहनांच्या धडकेत ते पुन्हा चिरडले जातात. ही वेदनादायी बाब ध्यानात घेऊन जनजागृती करण्याचा संकल्प या युवकाने केला आहे.
या यात्रेदरम्यान रस्त्यावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांना सुरक्षितपणे बाजूला करून त्यांची योग्य विल्हेवाट लावणे तसेच रस्त्यावरील मुक्या जीवांना अन्न-पाणी उपलब्ध करून देणे असा उपक्रम राबविण्यात येत आहे. मूकजीवांचे संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश या यात्रेतून देण्यात येत आहे.
यापूर्वी या प्राणिप्रेमी युवकाने 12 ज्योतिर्लिंगे आणि 12 राज्यांमध्ये तब्बल 27 हजार 500 किलोमीटरची सायकल यात्रा पूर्ण केली असल्याची माहिती देण्यात आली. आता 17 शक्तिपीठांच्या मार्गावर सुमारे 300 दिवसांचा प्रवास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी तालुका संघचालक शंकर बुद्धावर, तिरुपती मुद्दाम, चंद्रशेखर, माणिक रैतू यांच्यासह छत्रपती उपस्थित होते. उपस्थितांनी यात्रेकरूला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत ‘सेव्ह निमल, सेव नेचर’ हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.