नवी दिल्ली
bjp भारतीय जनता पक्षाने बुधवारी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी तसेच सह-प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये पक्षाने संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये बदल केले आहेत. या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, झारखंड, गोवा, केरळ, लडाख आणि लक्षद्वीप यांचाही समावेश आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासोबत जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, डॉ. प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.पंजाबमध्ये डॉ. सतीश पूनिया यांच्यावर प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली असून अलका गुर्जर यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये संजय भाटिया प्रभारी असतील, तर कविता पाटीदार आणि कुलजीत चहल सह-प्रभारी म्हणून काम पाहतील.महाराष्ट्रासाठी बैजयंत जय पांडा यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सहकार्याला अमित मालवीय, सदानंद शेट तणावडे आणि कमलजीत सहरावत यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार आणि कर्नाटकची जबाबदारी हरीश द्विवेदी यांच्याकडे देण्यात आली आहे. बिहारमध्ये संगीता यादव आणि रोहन गुप्ता सह-प्रभारी असतील, तर कर्नाटकमध्ये डॉ. कसम वेंकटेश्वरलू यांच्यावर सह-प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये स्मृती इराणी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सिद्धार्थ शम्भू सह-प्रभारी असतील. स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणाच्या प्रभारीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीसाठी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जामयांग त्सेरिंग नामग्याल आणि दर्शनाबेन जरदोश यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्यात प्रभारीपदाची जबाबदारी भारती प्रवीण पवार यांच्याकडे देण्यात आली असून अनिल अँटनी सह-प्रभारी म्हणून काम पाहतील.
झारखंडमध्ये गजेंद्र पटेल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ सिंह आणि निवेदिता सिंह यांची सह-प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. केरळच्या प्रभारीपदी एम. नागराजा यांची नियुक्ती झाली असून एम. वेंकटेशन सह-प्रभारी असतील. लडाखसाठी राजकुमार भाटिया यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर लक्षद्वीपची जबाबदारी जॉर्ज कुरियन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.दरम्यान, काँग्रेसनेही अलीकडेच पंजाबच्या संघटनात्मक जबाबदारीत बदल केला आहे. ५ सप्टेंबर २०२६ रोजी काँग्रेसने भूपेश बघेल यांच्या जागी सचिन पायलट यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये केलेले बदल विशेष चर्चेत आले आहेत.