लखनौ
bsp बहुजन समाज पक्षाच्या (BSP) संघटनात्मक रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, पक्षप्रमुख मायावती यांनी त्यांचे धाकटे पुतणे ईशान आनंद यांच्यावर राष्ट्रीय संयोजकपदाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी हे पद त्यांचे मोठे बंधू आकाश आनंद यांच्याकडे होते. आता आकाश यांच्या जागी ईशान यांना पक्ष संघटनेत पुढे नेण्याचा निर्णय मायावती यांनी घेतला आहे.
लखनौ येथे आयोजित करण्यात आलेल्या बसपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला देशभरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मायावती यांनी ईशान आनंद यांना राष्ट्रीय संयोजक म्हणून जबाबदारी देण्याची घोषणा केली. यावेळी ईशान यांनी मायावतींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. विशेष म्हणजे, पक्षाच्या बैठकीत मायावती यांच्याशिवाय इतर कोणी बोलणे ही नेहमीची बाब नसली, तरी या बैठकीत मायावती यांच्या भाषणानंतर ईशान आनंद यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
राष्ट्रीय संयोजकपदाची जबाबदारी दिल्याबद्दल ईशान यांनी मायावती यांचे आभार मानले. त्यांनी मायावती यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर काम करण्याची आणि त्यांच्या अपेक्षांना कधीही निराश न करण्याची ग्वाही दिली. पक्ष संघटनेतील ही जबाबदारी स्वीकारताना त्यांनी मायावती यांच्या मार्गदर्शनानुसार काम करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये आगामी निवडणुका बसपा स्वबळावर लढवणार असल्याचेही मायावती यांनी स्पष्ट केले आहे. या तीनही राज्यांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षासोबत आघाडी केली जाणार नसल्याची भूमिका त्यांनी बैठकीत मांडली.
ईशान आनंद यांना पक्षात पुढे करण्याचा निर्णय अचानक झालेला नसून, याबाबत मायावती यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या कुटुंबातील केवळ ईशान आनंद यांनाच पक्षाच्या राजकारणात पुढे आणले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. त्याचवेळी आकाश आनंद आणि त्यांच्या बहिणीला पक्षातील कोणतीही जबाबदारी दिली जाणार नसल्याचेही मायावती यांनी स्पष्ट केले होते.
आकाश आनंद यांना राजकारणात पुढे आणण्यामागे त्यांचे वडील आनंद कुमार यांचा आग्रह असल्याचे मायावती यांनी सांगितले होते. मात्र, विवाहानंतर आकाश यांच्या वर्तन आणि राजकीय हालचालींचा उल्लेख करत मायावती यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षापासून दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. आकाश हे त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली गेल्याचा आरोपही मायावती यांनी केला होता. अशा परिस्थितीत आकाश यांना पुन्हा पक्षात घेणे म्हणजे पक्षाशी विश्वासघात करण्यासारखे ठरेल, असेही त्यांनी म्हटले होते.
आनंद कुमार यांच्या कुटुंबातील असा सदस्य पक्षात पुढे आणण्याचा निर्णय बराच विचार करून घेण्यात आल्याचे मायावती यांनी सांगितले होते, जो आकाश आनंद यांच्या मार्गावर जाणार नाही. त्यानुसार ईशान आनंद यांना पक्षात महत्त्वाची आणि सन्मानजनक जबाबदारी देऊन संघटनेत पुढे नेण्याचे ठरवण्यात आले. मात्र, भविष्यात ईशान आनंद यांनीही पक्षविरोधी कोणतीही गंभीर कृती केल्यास त्यांच्यावरही पक्षातून कारवाई केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा मायावती यांनी दिला आहे.