अर्जुनी मोरगाव,
mla-badole आयआयटी मुंबई (पवई) येथील द्वितीय वर्षाचा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व सर्वंकष चौकशी करण्यात यावी. तसेच संस्थेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी आमदार इंजी. राजकुमार बडोले यांनी केली. साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आ. बडोले यांनी आयआयटी मुंबईच्या संचालकांसह वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून प्राध्यापकांची रिक्त पदे, आरक्षित प्रवर्गांचे प्रतिनिधित्व, विद्यार्थी कल्याण सुविधा, वसतिगृह व्यवस्था, स्टूडंट व्हेलनेस सेंटर, तक्रार निवारण यंत्रणा आणि मानसिक आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.

साहिल यांच्या कुटुंबीयांनी जातीय भेदभाव व मानसिक छळाचे आरोप केले आहेत. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला असून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम, मोबाइल व डिजिटल संदेश, उपलब्ध कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, परीक्षा कक्षातील परिस्थिती तसेच सहविद्यार्थी व प्राध्यापकांचे जबाब यांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी बडोले यांनी केली. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांचा अंतिम निष्कर्ष तपासातील पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच समोर आला पाहिजे. कोणत्याही एका पुराव्यावर निष्कर्ष न काढता संपूर्ण घटनाक्रमाची साखळी तपासली पाहिजे, असे बडोले यांनी स्पष्ट केले. आयआयटी मुंबईच्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेतील १,२२५ मंजूर प्राध्यापक पदांपैकी ७४२ पदे भरलेली, तर ४८३ पदे रिक्त होती. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांचे निर्धारित प्रतिनिधित्व पूर्ण होऊ न शकल्याचेही नमूद करण्यात आले होते. ही रिक्त पदे भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवून आरक्षणाच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी बडोले यांनी केली. आयआयटी मुंबईच्या मोठ्या निवासी विद्यार्थी समुदायाच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्य सेवा, प्रशिक्षित समुपदेशक, एससी/एसटी सेल आणि गोपनीय व विश्वासार्ह तक्रार निवारण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र चौकशीची मागणी
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य समोर येऊन त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. पोलिस तपासासोबतच या घटनेशी संबंधित संस्थात्मक बाबींची स्वतंत्र, पारदर्शक व निष्पक्ष चौकशी व्हावी. यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी करणार आहे, असे आमदार बडोले यांनी सांगितले.