घराजवळचा कुंड आता एका क्लिकवर

मनपाने काढला क्यूआर कोड; २२ फिरते मोबाईल टँकही सज्ज

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
नागपूर,
ganapati visarjan 2026मागील दहा दिवस प्रत्येकाच्या मनात घर करणाऱ्या लाडक्या बाप्पाला उद्या अनंत चतुर्दशीला ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात निरोप दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बाप्पांचा निरोप पूर्णपणे पर्यावरणपूरक व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे.

nmcwww 
 
महापौर नीता ठाकरे यांनी आज सक्करदरा तलाव, गांधी सागर तलाव, पोलिस लाईन टाकळी, कोराडी तलाव, सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छीविसा आणि नाईक तलाव परिसरातील कृत्रिम विसर्जन कुंडांची पाहणी केली. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर, आयुक्त डॉ. विपीन आणि सर्व झोनचे सभापती उपस्थित होते.
काय आहे तयारी?
महापौरांनी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, बॅरिकेडिंग, सुरक्षा रक्षक, विद्युत प्रकाश व्यवस्था आणि जलतरणपटूंची नेमणूक करण्याचे निर्देश दिले. आयुक्त डॉ. विपीन यांनी उपद्रव शोध पथक आणि पोलिसांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या.
४४७ विसर्जन कुंड
शहराच्या जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी मनपाने २२५ ठिकाणी एकूण ४४७ कृत्रिम विसर्जन कुंड तयार केले आहेत.
आतापर्यंतचे विसर्जन - नवव्या दिवशी ४९ ठिकाणी तयार केलेल्या १३७ कुंडांमध्ये २,२८६ मूर्तींचे विसर्जन झाले. यात २,१२४ मातीच्या आणि १६२ पीओपीच्या मूर्ती होत्या.
मोठ्या मूर्तींसाठी - गोरेवाडा, पोलिस लाईन टाकळी, कच्छीविसा आणि कोराडी येथे मोठ्या मूर्तींसाठी विशेष मोठे तलाव सज्ज आहेत. तसेच २२ फिरते मोबाईल कुंड नागरिकांच्या सेवेत आहेत.
एक क्लिकवर माहिती-
नागरिकांना जवळचा कुंड शोधण्यासाठी भटकावे लागू नये म्हणून मनपाने विशेष संकेतस्थळ आणि क्यूआर कोड तयार केला आहे. क्यूआर स्कॅन केल्यास जवळच्या कुंडाची माहिती मिळणार आहे.
निर्माल्यापासून खत
पर्यावरणपूरक उत्सवासाठी मनपाच्या दहाही झोनमध्ये १८ निर्माल्य रथ फिरणार आहेत. जमा झालेले निर्माल्य भांडेवाडी प्रकल्पात नेऊन त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. यासाठी नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक - १८०० २६७७ ९६६ जाहीर करण्यात आला आहे.