अनिल कांबळे
नागपूर,
Girlfriend Blocks Number. प्रेयसीसोबत फोनवर झालेल्या वादानंतर अस्वस्थ झालेल्या २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळमना परिसरातील भारतवाडा रोडवरील सुदामा आश्रम भागात रविवारी घडली. प्रेम शकूल (२३) असे मृताचे नाव आहे. प्रेम हा वॉर्ड क्रमांक ३४ मधील प्लॉट क्रमांक १२९ मागील सुदामा आश्रम परिसरात राहत होता. तो गेल्या सुमारे चार वर्षांपासून २० वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंधात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी प्रेमने मद्यपान केले होते . त्यानंतर त्याचे प्रेयसीसोबत फोनवरून वाद झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रेमचे वडीलांनी संबंधित तरुणीशी संपर्क साधला. त्यांनी तिला प्रेमचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने काही काळ प्रेमचा क्रमांक ब्लॉक केला. प्रेयसीने फोन क्रमांक ब्लॉक केल्याने प्रेम अस्वस्थ झाला. त्यानंतर तो घरातील बेडरूममध्ये गेला. तेथे त्याने दुपट्ट्याच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रेमला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर प्रेमच्या वडिलांच्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रेमने आत्महत्या करण्यामागील नेमकी कारणे आणि घटनेपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.