बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा...विदर्भासह 'या' जिल्ह्यांना तडाखा

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Heavy rainfall during the monsoon withdrawal यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहिल्यानंतर आता परतीच्या टप्प्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाची विविध रूपे पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या एका नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आगामी काही दिवसांत पावसाचा जोर आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने देशातील तब्बल १३ राज्यांसाठी पावसाचा हायअलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, आगामी २ ते ३ दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांतून मान्सूनच्या परतीसाठी पूर्णपणे पोषक वातावरण तयार होणार आहे. परंतु, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन एका 'डीप डिप्रेशन'मध्ये बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे काही ठराविक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.
 
 
d ५
 
 
हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये ताशी तीव्र वेगाने वारे वाहतील आणि समुद्राची स्थिती अत्यंत खवळलेली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. या हवामान बदलाचा प्रामुख्याने ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागावर मोठा परिणाम जाणवण्याची दाट शक्यता आहे. ओडिशामध्ये २३ ते २४ सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तर छत्तीसगड आणि तेलंगणातील काही भागांतही पावसाचा जोर कायम राहणार असून काही ठिकाणी पूरसदृश्य किंवा जलमय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, आज म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी केरळ, राजस्थान, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालय या एकूण १३ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
महाराष्ट्राचा विचार करता, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक तीव्र राहू शकतो. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांतही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.