अनिल कांबळे
नागपूर
instagram friendship इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर वादात झाल्यानंतर तरुणाने युवतीच्या घरात घुसून तिच्याशी मारहाण व छेडछाड केल्याचा आरोप आहे. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्यनगर गोदाम लेआउट परिसरात २१ सप्टेंबरच्या पहाटे घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रज्वल राजेंद्र थोरात (२७, रा. आर्वी, जि. वर्धा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तक्रारदार युवतीची प्रज्वलशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती.२१ सप्टेंबरच्या पहाटे प्रज्वल कथितरीत्या नशेच्या अवस्थेत युवतीच्या खोलीवर गेला. युवतीने त्याच्या फोन आणि मॅसेजला प्रतिसाद का दिला नाही?, असा जाब विचारत त्याने वाद घातला. वाद वाढल्यानंतर प्रज्वलने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधण्याचा प्रयत्न करून छेडछाड केल्याचा आरोपही तिने केला आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
तक्रार मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील आरोपांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपी सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून घटनास्थळ, तक्रारदाराचा जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आरोपांची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे, अशी पोलिसांची भूमिका आहे.