मुंबई
jayanti 2 box office महाविद्यालयीन स्तरावर आजही अस्तित्वात असलेल्या भेदभावाचा गंभीर विषय मांडणाऱ्या ‘जयंती २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर त्याची दमदार वाटचाल सुरू आहे. ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्यातील शो मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पहिल्या आठवड्यात राज्यातील १५० थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती २’चे आता २५० हून अधिक थिएटर्समध्ये ५०० पेक्षा जास्त शो सुरू आहेत. चित्रपटाने आतापर्यंत दोन कोटी रुपयांचा टप्पाही गाठला आहे.
मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘जयंती २’ची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. ‘जयंती’मधून प्रमुख भूमिकेत लक्ष वेधून घेणारा अभिनेता ऋतुराज वानखेडे यावेळीही मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याच्यासोबत पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष यांच्या भूमिका आहेत. संजीवकुमार हिल्ली यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली असून फैसल महाडिक यांनी संकलन केले आहे. डॉ. सुहास अंबादे, सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वरूप यांनी संगीत दिले आहे, तर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे.
चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल या तरुणीभोवती चित्रपटाची कथा फिरते. उच्च शिक्षण पूर्ण करून पुढे शेती करण्याचे स्वप्न ती पाहत असते. मात्र, महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिला रॅगिंगला सामोरे जावे लागते. या त्रासाला विरोध केल्यानंतर तिच्या आयुष्यात संघर्ष उभा राहतो. या संघर्षात पायलला काय परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि तिला न्याय मिळतो का, याचा वेध चित्रपट घेतो.
मात्र, ‘जयंती २’ची कथा केवळ पायलच्या संघर्षापुरती मर्यादित राहत नाही. महाविद्यालय प्रशासनाची भूमिका, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून होणारी वागणूक तसेच सरकारची भूमिका अशा विविध स्तरांवर शिक्षणव्यवस्थेकडे पाहण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. आधुनिक आणि प्रगत समाजव्यवस्थेचा दावा केला जात असतानाही विविध स्वरूपात कायम असलेल्या भेदभावाचा मुद्दा चित्रपट अधोरेखित करतो. त्याचबरोबर या भेदभावाच्या मुळाशी असलेल्या प्रश्नांकडेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते.२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ या चित्रपटानेही आपल्या आशयामुळे चर्चा निर्माण केली होती. त्याच प्रवाहाला पुढे नेत ‘जयंती २’ने शिक्षण क्षेत्रातील भेदभाव आणि त्याभोवतीचे राजकारण या विषयांना कथानकाच्या केंद्रस्थानी आणले आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून आकाराला येणारी गंभीर आणि विचार करायला लावणारी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्रपटाच्या वाढलेल्या शोजवरून दिसून येत आहे.पहिल्या आठवड्यात राज्यभरातील १५० थिएटर्समध्ये ‘जयंती २’चे शो सुरू होते. मात्र, चित्रपटाविषयी झालेली चर्चा आणि त्याच्या आशयाचे होत असलेले कौतुक यामुळे दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शनाचा आवाका वाढला आहे. आता २५० हून अधिक थिएटर्समध्ये ५०० पेक्षा जास्त शो सुरू असून चित्रपटाने दोन कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळातही ‘जयंती २’च्या बॉक्स ऑफिस कामगिरीकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष राहणार आहे.