कैलासराणा शिवचंद्रमौळी - अद्भुत शिवस्तुती...!

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
धर्म-संस्कृती
- प्रा.दिलीप जोशी
sivastuti शिवभक्तांमध्ये शिवलीलामृत, शिव महिम्न, शिवपंचाक्षरी जप, रुद्राभिषेक जितके प्रसिद्ध आहेत त्याहून अधिक आवडती आणि प्रसिद्ध आहे ती ‘कैलासराणा शिवचंद्रमौळी’ ही शिवस्तुती. ही शिवस्तुती सर्वत्र भक्तिभावाने गायिली जाते. स्कंदपुराणातील तत्त्वावर आधारित ‘कैलासराणा’ ही शिवस्तुती ‘कैलासराणा’ याच नावाने प्रसिद्ध आहे. शिवस्तुतीच्या रचनाकारांबाबत विविध मते असली, तरी उपलब्ध हस्तलिखिते आणि इतर माहितीवरून प. पू. श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी ही शिवस्तुती रचिली आहे. पूजनीय श्रीधरस्वामींचे कुलदैवत नागेश्वर असून त्यांच्या वडिलांचे नावदेखील नागेश आहे. श्रीधरस्वामींच्या अनेक रचनांमध्ये ‘नागेशतनय’ असा उल्लेख आहे. नागेश हा उल्लेख याही स्तुतीमध्ये आहे. त्यामुळे ही शिवस्तुती त्यांनी रचिली असल्याची खात्री पटते. ‘शिवलीलामृत’ हा ग्रंथ श्रीधरस्वामींनीच रचिला आहे. शिवलीलामृत किंवा त्यातील अकरावा अध्याय वाचल्यावर शिवस्तुती म्हणण्याची पद्धत आहे, हे विशेष. या शिवस्तुतीचे एकूण ३१ श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकांत म्हणजे शेवट हा ‘तुजवीण शंभो मज कोण तारी’ या आर्त हाकेने केला आहे. या शिवस्तुतीत नाद, माधुर्य आणि ओज असल्यामुळे गेयता आहे. त्यामुळे ही स्तुती शिवाची शक्ती आहे. तिच्या प्रत्येक स्वरात शिवतत्त्व आहे. त्यामुळे ही स्तुती गाताना सहज भावसमाधी लागते. या सुंदर रचनेचा भावार्थही खूपच गोड आहे.
 
 
sivastuti
 
 
 
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||१||
भगवान शंकराला आर्त हाक देताना भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन प्रारंभीच आहे. हे भगवान शिवा, आपण कैलास पर्वतावर निवासी आपल्या मस्तकी चंद्रकोर आहे. नागाचा मुकुट आपल्या माथ्यावर असलेले आपण करुणेचे सागर आहात. तुमच्याशिवाय मला कोण तारणार?
जटा विभूति उटि चंदनाची । कपालमाला प्रीत गौतमीची ।
पंचानना विश्व निवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||३||
हे भगवंता, आपण आपल्या जटेमध्ये विभूती आणि चंदनाचा लेप लावलेला आहे. कपाळी माला आणि साक्षात गौतमी गंगा धारण केली आहे. आपण आपल्या पाच मुखाने विश्वाला शांति प्रदान करता. प्रभू! तुमच्याशिवाय मला कोण तारेल?
वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||४||
उदार मेरु पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधीचा गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||५||
ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरीं दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||६||
हे भगवंता, आपण हातात त्रिशूळ धारण केलेले वैराग्य योगी आहात. आत्मज्ञान देणारे उमेचे स्वामी पण सदैव समाधी अवस्थेत राहता. लोकांना त्रास देणाऱ्या त्रिपुरासुराचा वध करणारे आपण उदार आणि शैलजेचे पती आहात. गजचर्म धारण केलेले दयानिधी तुमच्याशिवाय मला कोण तारणार?
कर्पूरगौरी गिरिजा विराजे । हळाहळें कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्य दुःखे स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||७||
स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देव चूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||८||
हे प्रभो, आपल्या समिप कर्पुरगौर असणारी गिरिजा आई, हलाहलामुळे आपण नीलकंठ झालेले आहात. आपण स्मशानात क्रीडा करणारे योगी आहात. तुमच्याशिवाय माझी संकटे कोण हरण करेल?
भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||९||
नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||१०||
हे विश्वनाथ, आपणच भूतांचे स्वामी आणि यमाचाही अंत करणारे, नंदीचे स्वामी नंदीकेश्वर, देव तुम्हाला विश्वनाथ म्हणतात. आपण सदाशिव, सर्वव्यापी आणि ताप हरण करणारे आहात. आपल्याशिवाय माझा ताप कोण हरण करेल? हे भगवंता! आपण उग्ररूप, भीषणरूप, विक्राळरूप आणि दिगंबर अवस्थेत आहात. कामदेवाचा विनाश करणारे रुद्र विश्वंभर आहात. तुमच्याच इच्छेने संसार उत्पन्न आणि नष्ट होतो. हे उमापती, भैरव आपणच विघ्नविनाशक आहात. माझी रक्षा तुमच्याशिवाय कोण करेल? हे प्रभो, आपण भागीरथीच्या तीरावर विश्वनाथ रूपाने असणारे त्रिनेत्रधारी आहात. प्रयाग क्षेत्री त्रिवेणी आपल्या चरणांची पूजा करतात. तुमच्याशिवाय माझे तारणहार कोण असेल बरं? हे भगवंता! तुझी स्तुती करण्यास मी अपात्र आहे. तू कैवल्यदाता असूनही मानवाला याची जाणीव नाही. तूच विश्वाचा नियंता आहेस. तुझ्याशिवाय माझा तारणहार कोण असेल? हे प्रभू! आपण तपस्वी, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे कामधेनू आहात. जो भक्त तुम्हाला भजतो त्याच्या सर्व इच्छा आपण पूर्ण करता. तुमच्याशिवाय मला कोण तारेल?
विरामकाळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनें चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ||
हे महादेवा, आयुष्याच्या अखेरी शरीर विकल, मन उदास होते. अशावेळी तुम्ही चिंतामणी बनून सुखद अंत आणि सर्वदुःखे टाळून मला मुक्ती दे. हे फक्त तूच करू शकतो. हे शंभो! तुझ्यामुळेच ब्रह्मनाद गगनात भरून उरतो त्यामुळे माझी प्रपंच माया नष्ट होते. तुझी कथा कुमारी म्हणजे शुद्ध आणि पवित्र शक्ती आहे. तुझ्या मुखावर अफाट आनंद, शांतता आहे. भिल्लांच्या रूपात लीला करणारे तुम्ही योगी ब्रह्मचारी आहात. हे महादेवा, कमरेला घंटामाळ, पिवळी वस्त्रे धारण केलेले आपण जिवाशिवाची अभंग समाधी लावत मायाचिंता नष्ट करता. तुमच्या शिवाय माझा तारणहार कोण असेल? हे महादेवा शंभू, तुम्ही गंभीर, धीरोदात्त, संकटांना न घाबरणारे, देवकुळाचे रक्षण करणारे तुम्हाला मंदार, बिल्व, बकुळ अशा विविध पुष्पांची माळा अर्पण करतो. हे प्रभो, तुला जाईजुई चंपक पुष्पमाळ धारण केलेले काशीनाथ आपणच आहात. आपल्या कानामध्ये अलक्ष्यमुद्रा म्हणजे साध्या डोळ्यांना न दिसणारी दिव्य कुंडले त्यामुळे भुरळ पाडणारे विलक्षण सौंदर्य आपले आहे.
नागेशनामा सकळा जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।
पंचाक्षरी घ्यान गुहाविहारीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ||२९||
इथे श्रीधरस्वामी आपले कुलदैवत तथा आपले वडील नागेश यांचे स्मरण नागेश्वराच्या रूपात करतात. ‘नम: शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राला सदैव हृदयरूपी गुहेत निवासी ठेवण्यास सांगतात. गुरूंचेही गुरू भगवान महादेवांना आपल्या हृदयात तुझे नाम कायम असू दे. कारण ते परम आनंद आणि सुख देणारे असल्याचे कथन करतात.
शास्त्राभ्यास नको श्रुति पढुं नको तीर्थासि जाऊं नको ।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ।
काळाचे भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडू नको ||३१||
सर्वात शेवटी आपल्याला खूप सुंदर संदेश त्यांनी दिला. शास्त्रांचा अभ्यास किंवा वेदपठन नको, तीर्थयात्रेचीही आवश्यकता नाही. योगाभ्यास, व्रतवैकल्ये किंवा कठीण तपश्चर्या करण्याचीही गरज नाही. मनात काळाची भीती किंवा दुष्टांची शंका बाळगू नका. फक्त ज्याच्या केवळ स्मरणाने पापी लोकही तरून जातात, त्या भगवान श्रीशंभू महादेवाचा कधीही त्याग करू नका. हा त्यांचा उपदेश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. n
९८२२२६२७३५