पुदुचेरी,
australia भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटचे सामने सध्या वेगवेगळ्या स्तरांवर सुरू आहेत. एका बाजूला भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाला आहे, तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. त्याचवेळी भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात पुदुचेरी येथे अनधिकृत कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारत ‘अ’ने पहिल्या डावात ३३४ धावा उभारत प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.
भारताच्या डावात साई सुदर्शनने संयमी फलंदाजी करत १०३ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. कर्णधार देवदत्त पडिक्कलला मात्र आपल्या फलंदाजीची छाप पाडता आली नाही. त्याने १४ चेंडूंचा सामना करत केवळ तीन धावा केल्या. त्यानंतर कुमार कुशाग्रने डावाची जबाबदारी सांभाळत शानदार शतक झळकावले. कुशाग्रने २४० चेंडूंत १२ चौकारांसह ११३ धावांची दमदार खेळी केली. तनुष कोटियननेही १३८ चेंडूंत ६९ धावांचे योगदान देत भारताची धावसंख्या वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारत ‘अ’च्या ३३४ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ‘अ’ची सुरुवात अडखळत झाली. पहिल्याच डावात त्यांचा निम्मा संघ माघारी परतला आणि संघाला १०० धावांचा टप्पाही गाठता आला नव्हता. ऑस्ट्रेलियाचे सॅम कॉन्स्टास आणि नॅथन मॅकस्वीनी यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूही अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. कॉन्स्टासने ७६ चेंडूंत २५ धावा केल्या, तर मॅकस्वीनी १७ चेंडू खेळूनही खाते उघडू शकला नाही.
भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील या मालिकेत दोन अनधिकृत कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. सध्या पहिला सामना सुरू असून, दुसरा सामना २९ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन अनधिकृत एकदिवसीय सामनेही होणार आहेत.