अनिल कांबळे
नागपूर
nagpur medical hospital मेडिकल रुग्णालयातून पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीला नवीन कामठी पोलिसांनी दुर्ग (छत्तीसगड) येथून शिताफीने अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला अजनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) दाखल गुन्ह्यातील आरोपी बोमट्या उर्फ शेख समीर शेख रहीम (वय २४, रा. चित्तरंजन नगर, कामठी) हा उपचारासाठी मेडिकल रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक १० मध्ये दाखल होता. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते १०.३० वाजताच्या दरम्यान वार्डात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा रक्षक पोलिसांना ‘झाडू-पोछा करायचा आहे, तुम्ही बाहेर थांबा’ असे सांगितले. त्यामुळे पोलिस अंमलदार वार्डाबाहेर थांबले होते. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी शौचालयाच्या ग्रिल नसलेल्या खिडकीतून पळून गेला. याप्रकरणी पोलिस अंमलदार अब्दुल सोहेल निसार (वय ३०) यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी समांतर तपासात आरोपीच्या शोधासाठी विविध पथके तयार केली होती. दरम्यान, नवीन कामठी पोलिसांना मिळालेल्या खत्रीशीर माहितीच्या आधारे त्यांनी आरोपीला दुर्ग (छत्तीसगड) येथून ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
खापरखेड्यात घडला होता गँगवार
खापरखेडा येथील मुख्य बाजारपेठेत २ ऑगस्ट रोजी गँगवार घडला होता. याप्रकरणी बोंमट्या आणि मुख्य सूत्रधार सूरज कावळेसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. बोंमट्याची प्रकृती खालावल्याने १७ सप्टेंबरला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चोवीस तास पाळत ठेवण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, पोलिसांची नजर चुकवून तो फरार झाला होता. एका मृतक मित्राच्या भावाच्या घरी बोंमट्या असल्याची माहिती नवीन कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली. माहितीवरून डीबी पथकाने दुर्ग पोलिसांशी संपर्क साधून त्याला अटक केली.