अहेरी
monkey attack घरात असताना लाल तोंडी वानराने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या अहेरी येथील रमेश बापू तोडसाम (60) यांना वन विभागाच्या वतीने 5 लाख रुपयांचे चेक स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी पाठपूरावा केला होता. त्यांच्या पाठपूराव्याला यश आले.
31 ऑक्टोबर 2025 रोजी रमेश तोडसाम यांच्या घरी ही घटना घडली होती. लाल तोंडी वानराने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याने ते जखमी झाले. या घटनेची नोंद घेत वन विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीस मिळणारे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले.
अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे यांच्या हस्ते रमेश तोडासाम यांना पाच लाख रुपयांचा आर्थिक सहाय्य निधी प्रदान करण्यात आला. यावेळी क्षेत्र सहाय्यक एस. एम. पडलवार, लेखापाल कुमारी अमृता वासर्डीकर आणि कार्यालयीन कर्मचारी श्रीनिवास कासेट्टीवार उपस्थित होते.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांना होणारी जीवितहानी व दुखापत लक्षात घेता, बाधित कुटुंबांना शासनाच्या नियमांनुसार आर्थिक मदत मिळणे महत्त्वाचे ठरते. वन विभागाच्या या मदतीमुळे जखमी रमेश तोडसाम यांना उपचार व पुढील खर्चासाठी मोठा आधार मिळाला आहे.