परिचारिकेच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur nurse death case धंतोली परिसरातील ३२ वर्षीय परिचारिकेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विवाहाचे आश्वासन देऊन नंतर नकार देणे तसेच खासगी छायाचित्रे आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. सचिन दहाट असे आरोपीचे नाव असून तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
 

nagpur nurse death case 
मृत तरुणी आणि सचिन दहाट यांच्यात २०१५ पासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या संबंधांची माहिती कुटुंबीयांनाही होती. सचिन पुण्यात पीएचडीचे शिक्षण घेत असताना दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्याने विवाहाचे आश्वासन दिल्याचे तरुणीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र, कालांतराने सचिनने विवाहास नकार दिला. त्यातून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. याच काळात सचिनने तरुणीची खासगी छायाचित्रे आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची तसेच तिच्या नातेवाइकांना पाठविण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे ती मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी संबंधित परिचारिकेने आत्महत्या केली. घटनेनंतर धंतोली पोलिसांनी तपास सुरू करून तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविले. त्यानंतर तक्रारीतील आरोप आणि प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे सचिन दहाटविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिसांकडून आरोपी आणि मृत तरुणीमधील संवाद, विवाहासंदर्भातील आश्वासन, खासगी छायाचित्रे व व्हिडीओबाबत करण्यात आलेल्या धमक्या तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.